महावितरणने नळयोजनेचा वीजपुरवठा पुन्हा तोडला; औश्यात निर्जळी!
By हरी मोकाशे | Published: March 25, 2023 04:04 PM2023-03-25T16:04:02+5:302023-03-25T16:04:21+5:30
औसा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणाची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे.
औसा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद करण्यात आला. पालिकेकडे जवळपास दीड कोटींची थकबाकी असून, ती न भरल्यामुळे महावितरणाने ही कारवाई केली. वीज खंडित करण्याची ही चौथी वेळ आहे. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा बंद झाल्याने उन्हाळ्यात नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे.
औसा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणाची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे. पालिकेने केवळ १० ते २० लाख रुपये भरले आहेत. संपूर्ण वीजबिल भरण्याबाबत महावितरणकडून सातत्याने तगादा सुरु आहे. नळपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे संपूर्ण रक्कम भरण्यास पालिका असमर्थ आहे, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सोनवणे यांनी सांगितले.
शहरात सध्या ४ हजार ३०० अधिकृत नळ कनेक्शन असून अनधिकृत नळ कनेक्शनची संख्याही तेवढीच असल्याची माहिती पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक प्रदीप पाटील यांनी दिली. मासिक १५ ते २० लाख रुपये वीजबिल येत असून, पाणीपट्टीची वसुली केवळ २ लाख रुपये होत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. शहरातील सर्व अनधिकृत नळ कनेक्शन शोधून ते बंद करण्याची मोहीम सुरू केली असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्याचा फायदा खाजगी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांना होत आहे.
पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा महावितरणने बंद केला आहे. थकबाकी भरण्यासंदर्भात महावितरण कार्यालयाने पत्र दिले आहे. शहरातील सर्वच सार्वजनिक बोअर (कुपनलिका) पालिकेने तात्काळ बंद केले असून, त्याचा वीजबिल भरणा करणे शक्य नाही. त्यामुळे त्याचे स्टार्टर काढून कनेक्शन बंद केले आहेत. अनधिकृत नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम राबवली जात असून दोन दिवसांत जवळपास २०० कनेक्शन बंद केले आहेत. शहरातील नळधारकांनी नळपट्टीची बाकी भरुन सहकार्य करावे.
- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी.