वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, तत्काळ पिकविमा द्या; शेतकऱ्यांचा उदगीर-लातूर मार्गावर रास्तारोको
By संदीप शिंदे | Published: July 10, 2024 06:38 PM2024-07-10T18:38:48+5:302024-07-10T18:39:07+5:30
तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
डिगोळ (लातूर) : शिरूर अनंतपाळ-चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पिकाचे नुकसान होत असलेल्या व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, पिकविमा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी रयतक्रांती संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने येरोळमाेड येथील उदगीर-नळेगाव-लातूर राज्य महामार्गावर बुधवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आंदोलनात रयतक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे, शिवानंद भुसारे, धनराज चावरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मागण्यांचे निवेदन शिरूर अनंतपाळचे नायब तहसिलदार गोविंद यादव, मंडळ अधिकारी सुनील खंदाडे, वनविभागाचे एस.जी. गिते यांना देण्यात आले. आंदोलनात बस्वराज निला, अमर माडजे, अशोकराव पाटील, राजकुमार बिरादार, शिवाजी पेठे, रामेश्वर चावरे, ऋषिकेश बद्दे, राहूल कांबळे, एस.एन. पाटील, बालाजी महाराज येरोळकर, तानाजी दांडगे, उमाकांत बोळेगावे, दिलीप ढोंबळे, बाळासाहेब केंद्रे, उतम गुणिले, ज्ञानोबा इंद्राळे, रामकिशन गडिमे, दगडवाडी, मल्लिकार्जून सगरे, महेश निवाळे, भानुदास धुमाळे, प्रदिप पाटील, मदन तांबोळकर, गुंडेराव चौसष्टे, वैजनाथ तोंडारे, अण्णाराव पाटील आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलिस उपनिरीक्षक गजानन अनसापुरे, शिवशंकर बिरादार, अंबादास पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
प्रत्येक ग्रामपंचायतीवर पर्जन्यमापक बसवावे...
हरण व रानडुकर या प्राण्यांपासून शेतीत खरिपात पेरणी केलेल्या कोवळी पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, १०० टक्के सबसिडीवर तारांचे कंपाऊंड देण्यात यावे, शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ करावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्यात यावे, मागील वर्षांच्या पिक विमा देण्यात यावा, गायीच्या दुधाला किमान ४० रुपये भाव देण्यात यावा, पर्जन्य मापक प्रत्येक ग्रामपंचायतीवर बसविण्यात यावे, सरकारने शेतकरी व शेतमजूराच्या पाल्यांना उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.