वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पूर्णत्वास आलेले मंगल कार्यालय भुईसपाट
By संदीप शिंदे | Published: May 23, 2024 07:48 PM2024-05-23T19:48:27+5:302024-05-23T19:49:55+5:30
लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील घटना : ७० टक्के उभारणी झाली होती पूर्ण
मुरुड (जि. लातूर) : लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ७० टक्के उभारणी पूर्ण झालेले मंगल कार्यालय भुईसपाट झाले आहे. मात्र, सुदैवाने मंगल कार्यालय कोसळले तेव्हा तिथे मजूर किंवा इतर कोणीही नव्हते. परिणामी, जीवितहानी झाली नाही. परंतू, मंगल कार्यालयावरील सर्वच पत्र्यांचा चोळामोळा झाला असून, ॲन्गल उखडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मुरुड परिसरातील एमआयडीसी भागात प्रसन्नकुमार लक्ष्मणराव कांबळे यांच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम चार महिन्यांपासून सुरु आहे. त्यासाठी ७० टक्के काम पुर्ण झाले होते. केवळ भिंतीचे काम बाकी होते. मात्र, गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मुरुड परिसराला चांगलेच झोडपले असून, रस्त्यावरील बोर्डचेही मोठे नुकसान झाले आहे. एमआयडीसी परिसरात मागील चार महिन्यांपासून मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरु होते. चार मजूर मंगल कार्यालय उभारणीचे काम करीत होते. कार्यालय कोसळले त्यावेळी सर्वच मजूर जेवणासाठी घरी गेले होते. मंगल कार्यालयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रसन्नकुमार कांबळे म्हणाले.
रस्त्यावरील होर्डिंग, झाडे पडली...
मुरुड परिसरात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लातूररोडवरील होर्डिंग पडले असून, मार्केट रोडसह परिसरात झाडे कोसळली आहेत. अवकाळी पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा काहीवेळ खंडीत झाला होता. दुपारच्या वेळी आलेल्या वादळामुळे बाजारपेठेतही धावपळ उडाली. ग्रामीण भागातून खरेदीसाठी आलेले अनेक ग्राहक वादळी-वारे बंद होताच गावाकडे परतले.