मांजरा २९ टक्के भरले, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; सिंचनासाठी मोठ्या पावसाची गरज

By हणमंत गायकवाड | Published: October 2, 2023 11:54 AM2023-10-02T11:54:16+5:302023-10-02T11:54:30+5:30

मांजरा प्रकल्पात २९ टक्के जिवंत पाणीसाठा : ४३ वर्षांमध्ये १६ वेळा धरण १०० टक्के भरले

Manjara Dam 29 percent full, drinking water concerns resolved; Heavy rainfall is required for irrigation | मांजरा २९ टक्के भरले, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; सिंचनासाठी मोठ्या पावसाची गरज

मांजरा २९ टक्के भरले, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; सिंचनासाठी मोठ्या पावसाची गरज

googlenewsNext

लातूर :लातूर शहरासह मांजरा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या एकूण २२ पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उपलब्ध झाले असले तरी सिंचनासाठी धरण भरणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ५०.५९४ दलघमी जिवंत पाणीसाठा झाला आहे. म्हणजे २९ टक्के पाणी प्रकल्पात संकलित झाले आहे. मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्या अंतर्गत जवळपास ३३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी पाणी घ्यायचे झाले तर मोठा पाऊस होणे गरजेचे आहे.

मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५६० मिमी पाऊस झाला आहे. या पावसावर यंदा वीस ते पंचवीस दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे. मांजराच्या वर असलेले दोन छोटे प्रकल्प अद्याप भरले नाहीत. त्यामुळे या प्रकल्पांच्या वर पाऊस होणे गरजेचे आहे. तरच मांजरा प्रकल्पात पाणी येते. गेल्या ४३ वर्षांमध्ये मांजरा प्रकल्पात १६ वेळा शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश वेळा मांजरा प्रकल्प परतीच्या पावसात भरलेला आहे. गतवर्षी १५ ऑक्टोबरला धरण भरले होते. यंदाही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच प्रकल्पात येवा सुरू झालेला आहे.

४३ वर्षांत १२ पावसाळ्यांत धरण कोरडे
मांजरा प्रकल्पाचे लोकार्पण १९८० मध्ये झाले. १९८० पासून धरण सोळा वेळा १००% भरलेले आहेः त्यानंतर १२ पावसाळ्यांत धरण कोरडेच राहिलेले आहे. पाऊस न झाल्यामुळे धरणाची ही स्थिती होती. सात वेळा धरण ५० टक्क्यांच्या पुढे भरले तर आठ वेळा ५०% च्या आत धरणात पाणीसाठा झाला होता. गत सोळा वेळा भरलेले धरण बहुतांश ऑक्टोबर महिन्यात किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भरले आहे.

मांजरा प्रकल्पामुळे १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली....
मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गत १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. डावा कालवा ९० कि.मी. अंतराचा आहे . त्यातून १०,५५९हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर, उजवा कालवा ७८ कि.मी.चा असून त्याअंतर्गत ७६६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, त्यासाठी धरण १००% भरणे आवश्यक आहे. तरच सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते.

लातूर शहराला दररोज लागते ५५ एमएलडी पाणी
लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ५० ते ५५ एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्या काही महिन्यांपासून लातूर शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापूर्वी आठ दिवसांआड करण्यात येत होता. पण, गतवर्ती धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने पाच दिवसांआड करण्यात येत आहे. पण, धरणातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगपालिका घेणार आहे, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे.

Web Title: Manjara Dam 29 percent full, drinking water concerns resolved; Heavy rainfall is required for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.