मांजरा धरण ५० टक्के भरले; अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा !
By हणमंत गायकवाड | Published: September 20, 2022 04:03 PM2022-09-20T16:03:02+5:302022-09-20T16:03:24+5:30
पूर्ण क्षमतेने पाणी पातळी होण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक आहे.
लातूर : लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब आदी प्रमुख गावांना पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्प ५० टक्के भरला असून, ८८.५२५ दलघमी जिवंत पाणीसाठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पात ४१.२३८ दलघमीची आवक झाली आहे. दरम्यान, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
मांजरा धरणाच्यावर अप्पर प्रकल्प आहे. हा प्रकल्पही भरलेला नाही. त्यामुळे मांजरा प्रकल्प अद्याप भरलेला नाही. प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५१३.५० मि.मी. पाऊस झाला असला तरी धरणात आतापर्यंत ४१.२३८ दलघमी नवीन पाणी आलेले आहे. धरणात एकूण ८८.५२५ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणी पातळीची क्षमता ६४२.३७ मि.मी. आहे. मात्र सध्याची पाण्याची पातळी ६३९.८० मीटर आहे. पूर्ण क्षमतेने पाणी पातळी होण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक आहे.
गेल्या २४ तासामध्ये प्रकल्प क्षेत्रात १२.५० मि.मी. पाऊस झाला आहे. त्यातून १.०९६ दलघमी पाण्याची आवक झालेली आहे. ही आवक गेल्या २४ तासांतील आहे. धरणात सध्या जिवंत साठा ८८.५२५ दलघमी आहे. पण जिवंत पाणीसाठ्याची क्षमता १७६.९६३ दलघमी आहे. ही क्षमता गाठण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात पाऊस होणे गरजेचे असल्याचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी सांगितले.