महामार्गाच्या दुरावस्थेने अनेकांनी प्राण गमावले; त्रस्त नागरिकांनी केलं प्रतीकात्मक तिरडी आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: January 24, 2025 17:44 IST2025-01-24T17:44:13+5:302025-01-24T17:44:40+5:30

लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर मसलगा पाटी येथे प्रतीकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढून गुरुवारी सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन केले.

Many lost their lives due to the poor condition of the highway; distressed citizens staged a symbolic protest | महामार्गाच्या दुरावस्थेने अनेकांनी प्राण गमावले; त्रस्त नागरिकांनी केलं प्रतीकात्मक तिरडी आंदोलन

महामार्गाच्या दुरावस्थेने अनेकांनी प्राण गमावले; त्रस्त नागरिकांनी केलं प्रतीकात्मक तिरडी आंदोलन

निलंगा :लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील भेगाळलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रोष व्यक्त करीत प्रतीकात्मक तिरडी अंत्ययात्रा मसलगा पाटी येथे काढण्यात आली. तसेच दोन तास रस्त्यावर ठिय्या मांडून नागरिकांनी शासनाचा जाहीर निषेध केला आहे. 

लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर मसलगा पाटी येथे प्रतीकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढून गुरुवारी सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग २ तास बंद असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. निकृष्ट कामाबाबत अनेक वेळा निवेदन देऊनदेखील प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे आजतागायत अनेक अपघात होऊन अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. रस्त्यावर दिशा दर्शक फलक, गतिरोधक नाही, साइडपट्ट्या खचल्या आहेत. याकडे तत्काळ लक्ष द्यावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मसलगा, गौर, मुगाव निटूर, कवठापाटी, आंबेगाव गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

अन्यथा तीव्र आंदोलन करणार...
लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले असून, यामध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशांना प्रशासनाने मदत जाहीर करून दुरवस्था झालेल्या रस्त्याचे येत्या चार दिवसांत दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी दिला आहे.

 

Web Title: Many lost their lives due to the poor condition of the highway; distressed citizens staged a symbolic protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.