घोषणेनंतर प्रकल्पांना मंजुरी नाहीच, लातूरकरांच्या स्वप्नातील रेल्वे कधी येणार रुळावर!
By राजकुमार जोंधळे | Published: February 1, 2023 05:22 PM2023-02-01T17:22:05+5:302023-02-01T17:23:08+5:30
रेल्वेमंत्र्यांना साकडे : बाेधन -उदगीर, लातूर राेड-नांदेड रेल्वे मार्ग रखडला
लातूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे मार्गाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. सतत मराठवाड्यातील नागरिकांकडून, प्रवाशांकडून यासाठी पाठपुरावा केला जात आहे. बाेधन - उदगीर, उस्मानाबद - बीड आणि साेलापूर - बीड - जळगाव हा रेल्वेमार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत रखडला आहे. ताे केव्हा मंजूर हाेणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना मराठवाडा जनता विकास परिषद लातूर महानगर शाखेच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे मंगळवारी साकडे घातले आहे.
यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड. भारत साबदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले. यामध्ये लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे, ॲड. व्यंकट बेद्रे, प्रा. सुधीर अनवले, महेंद्र जाेशी, शामसुंदर मानधना, ईश्वरचंद्र बाहेती, किशाेर जैन, प्रकाश घादगिने, शेख उस्मान, प्रा. भालचंद्र येडवे, प्रा. याेगेश शर्मा, राजकुमार हाेळीकर यांचा समावेश हाेता.
रेल्वेकाेच फॅक्टरीत स्थानिकांना आरक्षण द्या...
लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीतील नाेकर भरती करताना प्रामुख्याने स्थानिक उमेदवारांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने यावेळी केली आहे.
नांदेड-बीदर मार्गासाठी जमीन संपादन करा...
नांदेड आणि बीदर येथील गुरुद्वारांना भाविकांना सहज भेट देता यावी, प्रवासासाठी साेय व्हावी. यासाठी नांदेड-बीदर या नव्या रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाचा वाटा, जमीन संपादनाची सूचना राज्य शासनाला द्यावी. औरंगाबाद-अहमदनगर, औरंगाबाद-चाळीसगाव या नव्या रेल्वे मार्गाला तातडीने रेल्वे मंत्रालयाने मंजुरी द्यावी.
लातूर राेड - अहमदपूर - लाेहा - नांदेड मार्ग कधी?
गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर राेड - अहमदपूर - लाेहा - नांदेड रेल्वे मार्ग मंजुरीच्या कात्रीत अडकला आहे. या रेल्वे मार्गाला मंजुरी देत हा प्रश्न साेडवावा, अशी मागणीही केली आहे. त्याचबराेबर किनवट-माहूर या नवीन रेल्वे मार्गालाही मंजुरी देण्यात यावी.
नांदेड मध्यरेल्वे विभागाला जाेडा...
विशेष म्हणजे... रेल्वेचा नांदेड विभाग दक्षिण-मध्य रेल्वेऐवजी ताे मध्य रेल्वे विभागाला जाेडण्यात यावा, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशीही मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.