मराठा क्रांतीने काढली लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, श्रध्दांजली अर्पण करून पत्रकांना दिला अग्नी
By आशपाक पठाण | Published: September 9, 2023 06:49 PM2023-09-09T18:49:43+5:302023-09-09T18:51:49+5:30
लातूर मराठा क्रांतीच्या वतीने शनिवारी शैक्षणिक बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. याबबत मोठी जनजागृतीही करण्यात आली होती तथापि या संभाव्य अंत्ययात्रेबाबत मोर्चाने कमालीची गुप्तता पाळली होती.
लातूर : निष्क्रिय असल्याचा आरोप करीत लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आमदार - खासदारांची शनिवारी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत तिरडी ताब्यात घेतली व संतप्त आंदोलकांनी मराठा लोकप्रतिनिधींच्या नावे काढलेली श्रध्दांजली पत्रके एकत्र करुन त्यालाच अग्नी देत आपल्या भावनांना वाट करुन दिली.
लातूर मराठा क्रांतीच्या वतीने शनिवारी शैक्षणिक बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. याबबत मोठी जनजागृतीही करण्यात आली होती तथापि या संभाव्य अंत्ययात्रेबाबत मोर्चाने कमालीची गुप्तता पाळली होती. शनिवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन पुतळ्यासमोर बैठक दिली. त्यावेळी हलगी पथक तेथे आले त्यामुळे पोलिस काहींसे बुचकळ्यात पडले. त्यानंतर वाजत गाजत आंदोलकांनी पुतळ्यास चार- पाच प्रदक्षिणा घातल्या व ते थेट बार्शी रोडवर आले व तेथे ठेवलेली मराठा समाजाच्या आमदार- खासदारांची प्रतिकात्मक तिरडी उचलून त्यांच्या विरोधात प्रंचड घोषणाबाजी करीत अंत्यविधीसाठी खाडगाव स्मशानभूमीकडे मार्गस्थ झाले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत तिरडी ताब्यात घेतल्याने आंदोलक व पोलिसांत काहींसा तणाव निर्माण झाला. त्यानंतर रस्त्यावरच आंदोलकांनी बैठक मारुन मराठा लोकप्रतिनिधींच्या नावाने जोरदार बोंब ठोकली.
मराठा लोकप्रतिनिधींवर निष्क्रीयतेचा आरोप... -
मराठा आरक्षणाप्रती मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी करीत असलेली संदिग्ध विधाने व चालढकल याचा तीव्र शब्दांत आंदोलकांनी यावेळी निषेध केला. शेवटी मराठा लोकप्रतिनीधीच्या श्रध्दांजलीची हाती असलेली पोस्टर्स एकत्र करुन त्यालाच आंदोलकांनी प्रेत समजत अग्नी दिला. एकदंरीत या लक्षवेधी आंदोलनाने मराठा समाजात मराठा लोकप्रतिनिधींविषयी असलेला असंतोष पुन्हा उफाळून आला. या आंदोलनादरम्यान बार्शी रोडवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्याने छावणीचे रुप आले होते.
पथनाट्यातून खदखद...
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत आपले सर्व अंग रंगवलेला व तोंड काळे केलेला एक युवक सर्वांचे लक्ष वेधत होता. त्याने सादर केलेल्या पथनाट्याद्वारे मराठा समाजातील युवकांच्या मनात मराठा लोकप्रतिनिधीविषयी असलेली खंत बोलकी झाली होती.