Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार : संभाजी पाटील निलंगेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 01:30 PM2021-05-18T13:30:15+5:302021-05-18T13:31:04+5:30
Maratha Reservation : फडणवीस सरकारने घटनात्मक कारवाई करुन मराठा समाजाला आरक्षण दिले होते,परंतु आघाडी सरकारला ते टिकविता आले नाही
लातूर : मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होईल, अशी ग्वाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे दिली.
मराठा समाजाच्या विकासासाठी व समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी आरक्षण मिळणे गरजेचे होते, परंतु महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर लढाईत कुचराई केली त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. असे सांगत आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, फडणवीस सरकारने घटनात्मक कारवाई करुन मराठा समाजाला आरक्षण दिले होते,परंतु आघाडी सरकारला ते टिकविता आले नाही. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप कार्यकर्ते पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होतील, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरु ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे, असेही आ. निलंगेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यानंतर हे उघड झाले आहे. ठाकरे सरकारने समाजाची फसवणूक थांबवावी, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनात भाजप सक्रिय सहभाग नोंदवेल. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यास सरकार चालढकल करीत आहे. यावरुन सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होते असा आरोपही आ. निलंगेकर यांनी केला.