Maratha Reservation: पालकमंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांतीचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 07:35 PM2018-08-01T19:35:03+5:302018-08-01T19:35:31+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या लातूर येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
लातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या लातूर येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान निलंगा तालुक्यातील हरी जवळगा येथे मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या एलआयसी कॉलनीतील निवासस्थानाकडे सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलनाला जात असताना आंदोलकांना पोलिसांनी अडविले. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी बॅरिकेटस् काढून पालकमंत्र्यांचे निवासस्थान गाठले. तेथे पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या नावाने बोंबही ठोकली. पालकमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर पोलिसांनी बॅरिकेटस् लावले होते. त्यावर आंदोलकांनी हरकत घेऊन बॅरिकेटस् हटविण्याची मागणी केली. पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याने आंदोलक चिडले व त्यांनी बॅरिकेटस् काढून पालकमंत्र्यांचे निवासस्थान गाठले. तेथे त्यांनी घंटानाद केला. एक मराठा - लाख मराठा अशा घोषणा दिल्या.
पालकमंत्री कोठे आहेत, त्यांना मराठा समाजाच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. मराठा तरुण मरत आहेत, ते मात्र फिरत आहेत, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. पालकमंत्री पाटील मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य असून, त्यांनी कधी आरक्षणावर गंभीर चर्चा केली नाही, हा विषय मार्गी लागावा म्हणून खंबीर भूमिका घेतली नाही. राजकारण्यांनी समाजाचे वाटोळे केले आहे. समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण हाच पर्याय असून, ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आंदोलक यावेळी म्हणाले. पालकमंत्र्यांना मराठा समाजाच्या दैन्याची जाणीव असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
पालकमंत्र्यांचा निषेध...
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर बुधवारी लातूर दौऱ्यावर होते. त्यामुळे ते आंदोलकांची भेट घेतील. त्यांच्या भावना जाणून घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र आंदोलनस्थळी ते किंवा त्यांचा प्रतिनिधी न फिरकल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला.
हरी जवळगा येथे आंदोलन...
निलंगा तालुक्यातील हरी जवळगा येथील निलंगा-कासारशिरसी रस्त्यावर मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक तास रस्त्यावर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. आंदोलनात परमेश्वर बिराजदार, बालाजी हाडोळे, खंडू कोळनुरे, गजानन पाटील, बालाजी कोळनुरे, पिंटू ढगे, लखन पाटील, शंकर हाडोळे आदींचा सहभाग होता.