मराठा, खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला गती मिळेना; औराद मंडळात १०८ पैकी ५२ प्रगणकाचे ॲप बंद
By संदीप शिंदे | Published: January 25, 2024 05:50 PM2024-01-25T17:50:15+5:302024-01-25T17:50:44+5:30
राज्य मागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.
औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील सर्वात माेठे गाव असलेल्या औराद शहाजानी येथे सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा सलग तिसऱ्या दिवशी खेळखंडोबा झाला असून, मंडळातील १४ गावातील १०८ प्रगणकापैकी ५२ प्रगणकाचे ॲप बंद आहे. ओटीपी न येणे, सर्व्हर डाऊन दाखविणे आदी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राज्य मागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाची जबाबदारी ही सरकारी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत सर्वेक्षण होईल असे सांगण्यात आले असले तरी औराद शहाजानी मंडळात चाैदा गावे येतात. यात १०८ प्रगणक असून बुधवारी ५ प्रगणक अनुपस्थित होते. तर ५२ प्रगणकाचे ॲप बंद होते. यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने वरिष्ठांना माहीती कळविल्याचे पर्यवेक्षक आर.एस. मिरजगावकर यांनी सांगितले.
तीन दिवसांपासून तांत्रिक अडथळा...
औराद शहाजनी हे मोठे गाव असून, येथे सहा प्रभागात ४६५० कुटूंबसंख्या आहे. यासाठी ५० प्रगणक नियुक्त करण्यात आले असून, दोन सहाय्यक पर्यवेक्षक व एक मुख्य पर्यवेक्षक कामकाजासाठी देण्यात आलेले आहे. औराद शहाजनी येथील ५० प्रगणकांपैकी १७ जणांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. सलग तिसऱ्या दिवशीही बहूतांश जणांचे काम खोळंबले आहे. यासंबंधी सहाय्यक पर्यवेक्षक एस.एच. गिरी म्हणाले, अहवाल निलंगा येथील नायब तहसीलदारांना देण्यात आला आहे.