मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून सात वर्षात १२० गाड्या तयार हाेणार, लातुरात फॅक्टरीची पाहणी
By राजकुमार जोंधळे | Published: April 23, 2023 07:14 PM2023-04-23T19:14:04+5:302023-04-23T19:14:17+5:30
येथील एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या बांधणीला प्रारंभ हाेणार आहे.
लातूर : येथील एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या बांधणीला प्रारंभ हाेणार आहे. दाेन कंपन्यांना याचे काम देण्यात आले असून, सात वर्षात एकूण १२० रेल्वेगाड्या तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे दिली.
लातुरातील मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीची रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प २०१८ मध्ये लातूरमध्ये सुरू करण्यात आला. याठिकाणी सुरुवातीला रेल्वेचे नवीन डबे बनविण्यात येणार हाेते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी १५ ऑगस्ट राेजी भाषणात सांगितले, आम्ही यावर्षी देशात ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करू... त्यानंतर रेल्वे विभागाच्या आयसीएफ चेन्नईला वंदे भारत रेल्वेगाड्या तयार करण्यात येत आहेत.
लातूरची काेच फॅक्टरी तयार झाल्यानंतर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे डबे बनविण्यात आले नाहीत. आता या ठिकाणी नवीन निविदा काढण्यात आली. रेल्वेची कंपनी आरव्हीएनएल आणि रशियन कंपनीमध्ये करार झाला. त्यांना १२० वंदे भारत रेल्वेगाड्या तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यांनी अनामत रक्कम भरत्यानंतर त्यांना कार्यारंभ आदेश दिले जातील. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये या फॅक्टरीचा ताबा या कंपन्या घेतील आणि प्रत्यक्ष वंदे भारत रेल्वेगाड्यांच्या निर्मितीचे काम सुरू हाेईल. यातून लातुरात माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्मिती हाेणार आहे, असेही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
रेल्वे विभागाने केली ६०० काेटींची गुंतवणूक...
लातुरातील विस्तारीत एमआयडीसीमध्ये उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरी प्रकल्पासाठी रेल्वे विभागाने आतापर्यंत जवळपास ६०० काेटींची गुंतवणूक केली आहे. भविष्यात लागेल तसा निधी देता येणार आहे, असेही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
टप्प्या-टप्प्याने १२० रेल्वेगाड्यांची बांधणी...
दाेन कंपन्यांच्या संयुक्त करारातून येत्या सात वर्षात एकूण १२० वंदे भारत रेल्वेगाड्यांची बांधणी केली जाणार आहे. पहिल्या वर्षात १२, दुसऱ्या वर्षात १८, तिसऱ्या वर्षात २५ रेल्वेगाड्यांची बांधणी केली जाईल. सात वर्षात टप्प्या-टप्प्याने हा आकडा वाढविण्यात येणार आहे.