मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूक; अशी असेल मतदानाची पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 04:00 PM2023-01-09T16:00:33+5:302023-01-09T16:01:37+5:30
शिक्षकांना पसंती क्रमानुसार करता येणार मतदान
लातूर : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी लातूर जिल्ह्यात ४० मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान होणार आहे. मतदाराला आपले मतदान पसंती क्रमांकानुसार करावे लागणार आहे. दरम्यान, मतपत्रिकेसोबत पुरवलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचा वापर करावा लागणार आहे. याशिवाय इतर पेन, पेन्सिल बॉल पॉइंट, पेन याचा वापर करता येणार नाही.
मतदाराने ज्या उमेदवारास पहिला पसंती क्रमांक देण्यासाठी निवडले आहे. त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम असे नमूद केलेल्या रकान्यात एक हा क्रमांक नमूद करून मतदान करावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एकापेक्षा जास्त असेल, तरी एक हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली, तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, तेवढे पसंती क्रमांक नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम दोन,तीन, चार इत्यादी अंक तुमच्या पसंती क्रमानुसार पसंतीक्रम या स्तंभामध्ये दर्शवावा.
कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमूद करू नये. पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. तो एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांत दर्शवू नये. १, २, ३ इत्यादी असा दर्शवा. तुमच्या पसंतीक्रमानुसार पसंतीक्रम या स्तंभामध्ये दर्शवावा. अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरूपात असावा किंवा रोमन स्वरूपातील संविधानाच्या आठव्या सूचीतील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरूपात नोंदविता येतील.
मतपत्रिकेवर स्वाक्षरी नको...
मतपत्र किंवा स्वाक्षरी किंवा अद्याक्षरे किंवा कोणतेही शब्द नमूद करू नयेत, तसेच अंगठ्याचा ठसा उमटू नये, पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर कोणतीही खूण करू नये, अशी मतपत्रिका बाद ठरेल, तुमची मतपत्रिका वैध उमेदवारांपैकी एकाच्याच नावासमोर एक हा अंक नमूद करून, तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरूपाचे असून, ते अनिवार्य नाहीत, असे जिल्हाधिकारी तथा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी म्हटले आहे.