शासकीय कार्यालयात मार्चअखेरची लगीनघाई; सुटी दिवशीही जिल्हा परिषद सुरु
By हरी मोकाशे | Published: March 28, 2024 07:14 PM2024-03-28T19:14:34+5:302024-03-28T19:15:09+5:30
मार्च महिना आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याचा महिना होय. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात मार्चअखेरची धावपळ सुरु असते.
लातूर : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यातच आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना आल्याने जिल्हा परिषदेत मार्चअखेरची लगीनघाई सुरु आहे. २९, ३० व ३१ मार्च रोजी सार्वजनिक, साप्ताहिक सुट्टी असतानाही विनाविलंब कामांचा निपटारा व्हावा तसेच तात्काळ अनुदान वितरित व्हावे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अनमोल सागर यांनी या तिन्ही दिवशी कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे कामकाज नियमितपणे सुरु असल्याचे पहावयास मिळणार आहे.
मार्च महिना आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याचा महिना होय. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात मार्चअखेरची धावपळ सुरु असते. शासनाकडून उपलब्ध निधीचा तात्काळ वापर व्हावा जोरदार प्रयत्न सुरु असतात. दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेअंतर्गतच्या प्रस्तावित विकास कामांना मंजुरी देण्यासाठी सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली होती.
दरम्यान, मार्चअखेरमुळे विविध योजना, विकास कामांसाठी शासन अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून अनुदान प्राप्त होते. हे अनुदान बीडीएस प्रणालीद्वारे देयके तयार करुन कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गतच्या विविध योजना, विकास कामांसाठी प्राप्त निधीचा मुदतीत निपटारा व्हावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार या सार्वजनिक व साप्ताहिक सुटी दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यालय नियमितपणे सुरु ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी...
२९ मार्च रोजी सार्वजनिक सुटी आहे तर ३० आणि ३१ मार्च रोजी साप्ताहिक सुटी आहे. मात्र, मार्चअखेरमुळे या तिन्ही दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुरु राहणार आहे. या दिवशी कोणताही कर्मचारी अनुपस्थित राहणार नाही, याची दक्षता कार्यालयप्रमुखांनी घेण्याच्या सूचना सीईओ अनमोल सागर यांनी केल्या आहेत.
- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.