वाढीव घरपट्टी, नळपट्टीच्या निषेधार्थ उदगीरात नगरपालिकेवर मोर्चा
By हरी मोकाशे | Published: March 2, 2023 05:19 PM2023-03-02T17:19:32+5:302023-03-02T17:20:45+5:30
उदगीरात नागरी हक्क संरक्षण संघर्ष समितीचा संताप
उदगीर : नगरपालिकेने शहरवासियांवर लादलेली वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी व इतर अनावश्यक करामुळे सर्वसामान्य बेजार झाले आहेत. वाढीव कर रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी गुरुवारी दुपारी येथील नागरी हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
उदगीर पालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी व इतर अनावश्यक कर मोठ्या प्रमाणात वाढवून वसूली सुरु केली आहे. हा वाढीव कर रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील नागरी हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चात शहरातील नागरिक हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. पालिकेवर मोर्चा धडकल्यानंतर माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे यांनी संताप व्यक्त करीत जोपर्यंत पालिका वाढीव कर रद्द करीत नाही, तोपर्यंत शहरातील कुठल्याही नागरिकांनी पालिकेचा कोणताही कर भरणा करु नये, असे आवाहन केले. यावेळी रंगा राचुरे, रमेश अंबरखाने यांची समायोचित भाषणे झाली.
ठराव न घेताच करात दुप्पट वाढ...
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पालिकेतर्फे शहरवासियांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, काही वर्षांपासून तो सुरळीत होत नाही. महिन्यातून एकदा अथवा दोनदा पाणीपुरवठा होतो. मात्र, नळपट्टी संपूर्ण महिन्याची वसूल केली जाते. शासन निधीतून पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊनही नियमित पाणीपुरवठा होत नाही. पालिकेत ठराव मंजूर न करता पाणीपट्टीत दुप्पट वाढ करून सक्तीची वसुली सुरु आहे. इतर सोयी- सवलती न देता शिक्षण, आरोग्य, वृक्ष असे अनावश्यक कर वसूल केले जात आहेत. शहरात पालिकेची एकही शाळा नाही, एकही दवाखाना नाही, शहरात वृक्ष लागवड नाही, सार्वजनिक उद्यान, क्रीडांगण, सभागृह, ज्येष्ठांच्या व दिव्यांगांच्या सोयीच्या योजना नाहीत. परंतु, सर्व कर सक्तीने वसूल केले जात आहेत. हा शहरातील नागरिकांवर अन्याय आहे. शहरात नियमित स्वच्छता करावी, श्वान, वराहांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
निवेदनावर नागरी हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष रंगा राचुरे, माजी आ. प्रा. मनोहर पटवारी, सिध्देश्वर पाटील, मौलाना हबीब रहमान, प्रा. डॉ. विजयकुमार पाटील, फय्याज शेख, एन.एल. तिकटे, बापूसाहेब कज्जेवाड, रामविलास नावंदर, मंजुरखाॅ पठाण, सनाउल्ला खान, ॲड. व्ही.एन. औरादे, संग्राम हुडगे, बस्वराज पाटील मलकापूरकर, मारोतीराव चौधरी, शिवशंकर बडीहवेली, डॉ. ए.आर. पाटील, राम जाधव, धनाजी बनसोडे, बाबासाहेब सूर्यवंशी, दीपक बलसूरकर, प्रा. एस.एस. पाटील, अहमद सरवर, नजीर हाशमी, सुधाकर दापकेकर यांच्यासह जवळपास दोन हजार नागरिकांच्या सह्या आहेत. मार्चात महिलांची मोठी उपस्थिती होती.