बैलपोळ्यानिमित्ताने बाजारपेठ साहित्यांनी सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:28+5:302021-09-05T04:24:28+5:30
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी सार्वजनिक सण, उत्सवांना परवानगी नाही. त्यामुळे बैलपोळा सण साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार ...
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी सार्वजनिक सण, उत्सवांना परवानगी नाही. त्यामुळे बैलपोळा सण साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. या सणानिमित्ताने बाजारपेठ साज शृंगारांनी सजली आहे; परंतु साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांनी साहित्य खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
कोरोनामुळे शेतीमालाला भाव नसल्याने थोडाफार बाजार केला. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. गतवर्षी १५०० रुपयांच्या साहित्याची खरेदी केली होती, असे येथील शेतकरी तुकाराम गोरगिळे यांनी सांगितले.
गतवर्षी कोविडमुळे पोळा सण साजरा करता आला नाही. यंदा कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विक्रीसाठी साज, गोंडे, मोरखी, कासरे, पैंजण, शेंदूर, रंग, वारनेस, खरेदी करून ठेवले आहे; पण बैलांचा साज खरेदीसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे अपेक्षित विक्री झाली नाही, असे येथील व्यापारी औदुंबर मद्रेवार यांनी सांगितले.
सण सार्वजनिक साजरा करू नये...
या वर्षीही कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सवांना परवानगी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधनाची मिरवणूक काढता येणार नाही. शेतकऱ्यांनी कोविडच्या नियमांचे पालन करीत घरी अथवा शेतात पशुधनाची पूजा करून सण साजरा करावा.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.