दोन लाखासाठी विवाहितेस घराबाहेर हाकालले; पतीसह सहा जणांवर गुन्हा
By हरी मोकाशे | Published: August 10, 2022 06:19 PM2022-08-10T18:19:31+5:302022-08-10T18:20:34+5:30
लग्नानंतर सहा महिन्यांनी सासरच्या मंडळींनी ऑटो घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात
उदगीर (जि. लातूर) : ऑटो घेण्यासाठी माहेरहून दोन लाख घेऊन ये म्हणून शहरातील समतानगरातील एका विवाहितेस सासरच्या मंडळींनी तिला मानसिक व शारीरिक त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातून हाकलून दिले. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विवाहिता सविता बिरादार (रा. समतानगर, हमु. महेश कॉलनी, उदगीर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा विवाह चांदेगाव (ता. उदगीर) येथील मनोज बिरादार यांच्यासोबत १० जून २०१४ रोजी झाला होता. तेव्हा माहेरच्यांनी रोख दीड लाख, दीड तोळे सोने देऊन रितीरिवाजाप्रमाणे विवाह लागून दिला होता. लग्नानंतर सहा महिन्यांनी सासरच्या मंडळींनी ऑटो घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा विवाहितेच्या वडिलांनी नातलगासमक्ष बैठक घेऊन ५० हजार दिले.
परंतु, त्यानंतर तुझ्या वडिलांनी दीड लाख का दिले नाही, असे म्हणून पतीसह सासरा, सासू, दिर, जाऊ यांनी सतत शिवीगाळ करु लागले. पती मद्यप्राशन करुन सतत मारहाण करु लागले. ही बाब आई- वडिलांना सांगितली. तेव्हा वडिलांनी माझी परिस्थिती गरीब आहे. माझ्या मुलीला चांगले नांदवून घ्या असे म्हणू लागले. दरम्यान, महिला तक्रार निवारणमध्ये बैठक होऊनही तडजोड झाली नाही. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.