मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, पाणी उभ्या पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल
By संदीप शिंदे | Published: September 5, 2022 05:07 PM2022-09-05T17:07:44+5:302022-09-05T17:08:00+5:30
पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतात पाणी शिरले असून पिकांचे नुकसान झाले आहे
निलंगा (जि. लातूर): तालुक्यात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे मसलगा प्रकल्प ९७ टक्के भरला असून, चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी उभ्या पिकात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
निलंगा तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी पहाटे मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडून ३८.४२ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे प्रकल्प अभियंता देशमुख यांनी सांगितले. प्रकल्प ९७ टक्के भरला असून, कुठल्याही क्षणी अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाखालील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, चार गेटमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने हे पाणी चक्क शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात शिरत असल्याने पीक क्षेत्राचे कायम नुकसान होत आहे. यासंदर्भात हे क्षेत्र कायमस्वरूपी बाधित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला असून, या नुकसानीची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.
कायमस्वरूपी बाधित क्षेत्र जाहीर करा...
अनेक वर्षांपासून सलगा येथील शेतकऱ्यांना प्रकल्पातील पाणी सोडल्यास पिकांची आशा सोडून द्यावी लागते. त्यामुळे कायमस्वरूपी बाधित क्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी गुरुनाथ जाधव, तुळशीदास साळुंखे, अभिनंदन जाधव, बलभीम जाधव, पंडित जाधव, प्रकाश ओम, निवृत्ती पाटील, प्रकाश जाधव, सतीश जाधव, बळीराम पाटील, बाबासाहेब पाटील, परमेश्वर पवार, गोविंद पाटील, हरी साळुंखे, पांडुरंग साळुंखे यांनी केली आहे.