शिक्षकांच्या मागण्यांवर शिक्षण विभागाकडून मोघम उत्तरे; संघटना आक्रमक
By संदीप शिंदे | Published: January 21, 2023 06:25 PM2023-01-21T18:25:46+5:302023-01-21T18:26:37+5:30
काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा इशारा
लातूर : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक संघटनांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले होते. सीईओंनी सर्व प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे अभिवचन दिले हाेते. मात्र, बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शिक्षण विभागाने मोघम दिल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून, पहिल्या टप्प्यात काळ्या फिती ७ फेब्रुवारी रोजी शाळेवर काळ्या फिती लावून काम करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.
अध्ययन स्तराच्या नावाखाली वेगवेगळे प्रयोग राबवून शिक्षक, मुख्याध्यापकांना वेठीस धरु नये, २०२०-२१ मध्ये कपात रकमेचा ऑनलाईन हिशेब अपडेट करावा, सातव्या आयोगाचा पहिला हप्ता वगळलेल्या तालुक्यांना देण्यात यावा यासह विविध मागण्या संघटनांकडून करण्यात आल्या आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाकडून मोघम माहिती दिली जात असल्याने शिक्षक संघटनांकडून ७ फेब्रुवारी रोजी शाळांवर काळ्या फीती लावून कामकाज केले जाणार आहे. तसेच पुढील टप्प्यात ढोल बजाओ, धरणे, विराट माेर्चा काढण्यात येणार असल्याचे आम्ही शिक्षक, सर्व शिक्षक संधटनांकडून सांगण्यात आले.
यावेळी मागण्यांचे निवेदन सीईओ, शिक्षणाधिकारी, डायटच्या प्राचार्यांना देण्यात आले. यावेळी शिक्षक काँग्रेस प्रतिनिधी सभेचे जिल्हाध्यक्ष केशव गंभीरे, बहूजन शिक्षक संसदेचे मंगेश सुवर्णकार, जुनी पेन्शन संघटनेचे अरविंद पुलगुर्ले, शिक्षक सेनेचे शरद हुडगे, शिक्षक परिषदेचे मच्छिंद्र गुरमे, पंजाबराव देशमुख परिषदेचे ज्ञानेश्वर जाधव, प्राथमिक शिक्षक संघाचे सुनील हाके, बहूजन शिक्षक महासंघाचे दिनेश कांबळे, नवनिर्माण शिक्षक सेनेचे माधव गिते, प्राथमिक शिक्षक समिती, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, शिक्षक सहकार संघटनेचे विठ्ठल बडे, प्रल्हाद इगे आदींची उपस्थिती होती.'