लाच म्हणून बीयर स्वीकारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:48 PM2019-06-01T18:48:27+5:302019-06-01T18:51:14+5:30
स्वयंमुल्यांकनासाठी केली लाचेची मागणी
लातूर : तालुक्यातील निवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ भालचंद्र हरिहर चाकूरकर (४३) याला तक्रारदार आरोग्य कर्मचाऱ्याच्या स्वयंमुल्यांकनाच्या अहवालात बदल करण्याच्या कामासाठी लाच म्हणून बीयर आणि व्हिस्कीची बॉटल स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशीरा रंगेहाथ पकडले. याबाबत विवेकानंद पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तक्रारदार आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे़ दरम्यान, या कर्मचाऱ्याच्या २०१८-१९ मधील स्वयंमुल्यांकन (एसीआर) अहवालावर देण्यात आलेला ‘बी प्लस’ शेरा रद्द करून तो ‘ए प्लस’ करण्यात यावा. या कामासाठी डॉ़ भालचंद्र चाकूरकर याने दारूसह पार्टी देण्याची मागणी केली होती. दरम्यान, याबाबत संबंधित त्रस्त झालेल्या तक्रारदाराने २८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यालातूर कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री औसा रोडवरील एका ढाब्यावर सापळा रचला. यावेळी डॉ. चाकूरकर याने वॉईनशॉप मधून बीयर आणि व्हीस्कीची बाटली (किंमत ९८० रुपए) तक्रारदाराला घेऊन येण्यास सांगितली व ती पंचासमक्ष स्वीकारली़ यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले.
याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम (संशोधन) २०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक माणिक बेद्रे यांच्या पथकाने केली. पथकामध्ये पोलीस निरीक्षक वर्षा दंडिमे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, पोलीस हवालदार, लक्ष्मीकांत देशमुख, पोलीस नाईक चंद्रकांत डांगे, मोहन सुरवसे, मपोना शिवकांता शेळके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन धारेकर, दत्ता विभूते, शैलेश सुडे, राजू महाजन यांचा समावेश होता.