स्वतंत्र विद्यापीठासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार: क्रीडामंत्री संजय बनसोडे
By आशपाक पठाण | Published: December 10, 2023 06:40 PM2023-12-10T18:40:59+5:302023-12-10T18:41:27+5:30
आश्वासनानंतर कृती समितीने उपोषण मागे घेतलं आहे
लातूर : शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समितीची बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी आंदोलकांना दिले. तद्नंतर त्यांच्या हस्ते आंदोलकांना नारळ पाणी देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी रविवारी सकाळी आंदोलकांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतंत्र विद्यापीठासाठी मागणी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भाजपच्या प्रवक्त्या प्रा. प्रेरणा होनराव, संजय सोनकांबळे, अधिवक्ता परिषदेचे जिल्हामंत्री ॲड. दयानंद मिटकरी, ॲड. त्र्यंबक सरवदे, सुनील खडबडे, ॲड. राधिका पाटील, ॲड. दीपक माने, संभू फुळगामे, हरीश साठे, रेशमा होळकर आदींची उपस्थिती होती.
माजी आमदार तथा भाजपच्या राष्ट्रीय किसान मोर्चाचे गोवा प्रभारी शिवाजीराव पाटील-कव्हेकर, निलकंठ पवार यांनीही पाठिंबा दर्शविला. ७ डिसेंबरपासून सुरू असलेल्या आंदोलनास रविवारी राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी भेट दिली. स्वतंत्र विद्यापीठासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपोषणकर्ते संयोजक ॲड. प्रदीपसिंह गंगणे, ताहेरभाई सौदागर, बालाजीअप्पा पिंपळे, अजयसिंह राठोड, अतिश नवगिरे, धनराज जोशी यांना नारळ पाणी देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड. व्यंकटराव बेद्रे, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, नवनाथ आलटे, युवकचे अध्यक्ष लाला सुरवसे आदींची उपस्थिती होती.