नवीन वीजजोडणीसाठी मुबलक मीटर उपलब्ध- राहुल गुप्ता
By आशपाक पठाण | Published: July 11, 2024 09:14 PM2024-07-11T21:14:16+5:302024-07-11T21:14:38+5:30
बडे थकबाकीदार रडारवर, कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई
लातूर: महावितरणकडे नवीन घरगुती विद्युत जोडणीसाठी मुबलक मीटर आहेत. जोडणीसाठी अधिकृत शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेतले जात नाही. जर कोणी तशी मागणी करीत असेल तर तक्रार करा. संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल, अशी माहिती महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी गुरूवारी येथे पत्रपरिषदेत दिली.
शेतातील विद्युत डीपी जळाली किंवा बिघाड झाला तर शेतकरी वर्गणी करून ती दुरूस्त करतात यावर गुप्ता म्हणाले, शेतकऱ्यांनी तशी महावितरणला माहिती द्यावी, संबंधित कर्मचारी ते दुरूस्त करून देतील. शेतकऱ्यांना स्वत:च्या खिशातून खर्च करण्याची गरज नाही. माहिती देऊनही दुरूस्ती होत नसेल तर तक्रार करावी. महावितरण आता २४ तास वीज देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लातूर शहरातील वीजग्राहकांसाठी पुढील काळात वाढत जाणारी मागणी लक्षात घेवून प्रस्तावीत उपकेंद्रासाठीच्या जागेचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत.
महावितरण मागेल त्याला वीज पुरवठा देण्यास बांधील असून मीटरची कमतरता भासल्यास प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचना त्यांनी केल्या. थकबाकी वसुलीत कर्मचाऱ्यांनी कुचराई करू नये,अन्यथा कारवाई केली जाईल. सध्या बडे थकबाकीदार महावितरणच्या रडावर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे, मकरंद आवळेकर यांची उपस्थिती होती. यावेळी गुप्ता यांनी शहर व जिल्ह्यातील समस्या जाणून घेतल्या.
लातूर,धाराशिवच्या कामाचा आढावा...
लातूर येथे हॉटेल ग्रॅंडमध्ये लातूर व धाराशिव मंडळातील विविध कामांचा तसेच वसुलीचा आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, वाशी भूम तसेच लोहारा तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, जळकोट, लातूर शहर शाखा क्रमांक आठ या कार्यालया अंतर्गत वीजबील वसुली बाबत चिंता व्यक्त करत कार्यक्षमता वाढवत मागील थकबाकीसह चालू महिन्याचे शंभर टक्के वीजबील वसूल करण्याचे निर्देश दिले. व्यावसायिक ग्राहकांकडे थकबाकी असूनही वीजबील भरण्यास टाळाटाळ करत असतील तर संबंधीत ग्राहकांच्या घरगुती ग्राहक क्रमांकावर बोजा टाकण्याच्या सूचना केल्या. प्रधानमंत्री सुर्यघर योजना व सौर कृषीपंपाच्या कुसूम योजनेचाही आढावा घेत निर्धारीत वेळेत अर्ज मंजूर करून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचेही निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक राहूल गुप्ता यांनी दिले.