लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे मिलिंद लातुरे

By admin | Published: March 21, 2017 05:09 PM2017-03-21T17:09:36+5:302017-03-21T17:09:36+5:30

भाजपाने लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे सामान्य शेतकरी असलेले मिलिंद लातुरे यांची तर उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांची निवड केली

Milind Latur of BJP is elected president of Latur Zilla Parishad | लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे मिलिंद लातुरे

लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे मिलिंद लातुरे

Next
> ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 21 -  ३५ वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावलेल्या भाजपाने लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे सामान्य शेतकरी असलेले मिलिंद लातुरे यांची तर उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांची निवड केली. अध्यक्षपदाच्या शर्यतीत शेवटपर्यंत चर्चेत असलेल्या प्रकाश देशमुख यांची सभागृह गटनेतेपदी निवड झाली.  बहुमत असूनही कमालीची गोपनियता बाळगत भाजपाने अगदी शेवटच्या क्षणी या निवडीच्या घोषणा केल्या. 
लातूर जिल्हा परिषदेत भाजपाला स्पष्ट बहुमत होते. ५८ पैकी त्यांच्याकडे स्वत:चे ३६ तर एका अपक्षाच्या पक्षप्रवेशाने ३७ चे संख्याबळ होते. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची फक्त औपचारिकता बाकी होती.  पालमकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत सकाळी ‘कॉर्निव्हल’मध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली. यावेळी आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, रमेश कराड, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष  नागनाथ अण्णा निडवदे आदींचीही उपस्थिती होती. अनेक इच्छुकांच्या नावावर चर्चा झाल्या. मात्र सर्वानुमते अध्यक्षपदासाठी मिलिंद लातुरे यांचे तर उपाध्यक्षपदासाठी रामचंद्र तिरुके यांचे नाव ठरले. तिरुके हे मावळत्या सभागृहात भाजपाचे गटनेते होते. विरोधी पक्षाची धार त्यांनी मोठी केली होती. जिल्हा परिषदेच्या कामाचा त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. यामुळेच त्यांच्याकडे उपाध्यक्षपद दिले गेले. या दोघांनीही दुपारी साडेबारा वाजता आपापल्या उमेदवारीचे अर्ज भरले. काँग्रेसने उमेदवारी अर्जच न भरल्याने या दोघांच्या निवडीची औपचारीक घोषणा झाली. 
प्रकाश देशमुख यांची गटनेते पदावर बोळवण ! 
अहमदपूर तालुक्यातील हडोळती गटाचे सदस्य प्रकाश देशमुख यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र निवडणुकीत भाजपाने  जाहिरनाम्यात सामान्य शेतकऱ्यालाच अध्यक्ष करणार अशी घोषणा केली होती. नेमक्या याच मुद्यावर प्रकाश देशमुख यांचे नाव मागे पडून मिलिंद लातुरे यांचे नाव पुढे आले. 
महापालिका डोळ्यासमोर ठेवून भाजपाचा लिंगायत चेहरा 
येत्या महिन्यात लातूर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या डोळ्यासमोर ठेवून भाजपाने जिल्हा परिषदेवर लिंगायत चेहरा दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद हे लिंगायत समाजाला यापूर्वी कधीच मिळाले नाही. लातुरे यांच्या रुपाने ते  पहिल्यांदाच मिळाले आहे. यापूर्वी उपाध्यक्षपद अनेकवेळा मिळाले, मात्र अध्यक्षपद मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने लातूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने लिंगायत समाजाला काँग्रेसपासून तोडण्याची चाल खेळली असल्याचे बोलले जात आहे. 
अन् भाजपाने ‘शेतकरी अध्यक्ष करणार’चा जाहीरनामा पाळला ! 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख उतरल्यानंतर भाजपाकडून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ‘भाजपा सामान्य शेतकऱ्याला अध्यक्ष करणार’ असे घोषित करुन जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर अध्यक्षपदाच्या खुर्चीत शेतकरी बसल्याचे छायाचित्र छापले होते. हा शब्द मिलिंद लातुरे या सामान्य शेतकऱ्याला अध्यक्ष करून भाजपाने आपला शब्द पाळला. 
पालकमंत्र्यांचे निलंगाच राहीले जि. प. च्या सत्तेचे केंद्र ! 
जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामुळे निलंगा झाले आहे. ते स्वत: पालकमंत्रीही आहेत. याशिवाय अध्यक्ष झालेले लातुरे हे निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा गटाचे आहेत. मात्र त्यांचा गट औसा विधानसभा मतदारसंघात जातो.  याशिवाय उपाध्यक्ष झालेले रामचंद्र तिरुके हे निलंगा विधानसभा मतदारसंघातील वलांडी येथून निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या सर्व चाव्या निलंगा तालुक्यातच राहिल्याची चर्चा जि. प. त रंगली होती.

Web Title: Milind Latur of BJP is elected president of Latur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.