किमान तापमान ७.५ अंशावर; पिकांना थंडी बाधली, विविध रोगांच्या प्रादूर्भावाचा धोका

By संदीप शिंदे | Published: December 15, 2023 04:27 PM2023-12-15T16:27:13+5:302023-12-15T16:27:49+5:30

वातावरणात बदल झाल्याने पहाटेपासून तेरणा काठासह औराद परिसरात धुक्याची चादर पसरत आहे.

Minimum temperature at 7.5 degrees; Crops are affected by cold, risk of outbreak of various diseases | किमान तापमान ७.५ अंशावर; पिकांना थंडी बाधली, विविध रोगांच्या प्रादूर्भावाचा धोका

किमान तापमान ७.५ अंशावर; पिकांना थंडी बाधली, विविध रोगांच्या प्रादूर्भावाचा धोका

औराद शहाजानी : मध्यंतरी बंगालच्या उपसागरात मिचँग वादळ निर्माण झाल्याने काही भागात हलका तर मध्यम पाऊस झाला. अनेक दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने सुरू झालेली थंडी काही दिवसांपुर्वी तापमान वाढीने नाहीशी झाली होती. मात्र, आता परत साेमवारपासून वातावरण स्वच्छ हाेताच थंडी सुरु झाली आहे. शुक्रवारी औराद शहाजानी हवामान केंद्रावर ७.५ किमान तापमान पोहचले असून, तेरणाकाठ गारठला आहे.

साेमवारी ढगाळ वातावरण कमी झाल्याने थंडी पुन्हा जाणवू लागली आहे. किमान तापमान १७ वरुन खाली येण्यास सुरुवात झाली. मंगळवारी १५ अंश, बुधवारी १४, गुरुवारी १२ अंशावर तापमान खाली येत शुक्रवारी ७.५ अंशापर्यंत निचांकी स्तरावर पाेहचले. उत्तर भारतातून गेल्या काही दिवसापासून थंड गारवा महाराष्ट्रात येत असून, गारव्याने पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी औराद हवामान केंद्रावर ७.५ अंश किमान तर कमाल २९ अंश तापमानाची नोंद झाली.

औराद शहाजानी परिसरात मध्यंतरी वातावरणात बदल हाेऊन ढगाळ वातावरण तयार झाले हाेते. काही ठिकाणी हलका पाऊस झाला. यावर्षी सतत ढगाळ वातावरण व धुके पडत राहिल्याने पिकांना माेठा फटका बसला आहे. यातच थंडी कमी हाेऊन कमाल व किमान तापमानात वाढ झाली हाेती. आता साेमवारपासून उत्तरेकडे थंड वारा वाहु लागला असल्याने गारठा वाढुन औराद शहाजानी परीसरातील तापमानाची यावर्षातील निच्चांकी नोंद झाली असल्याचे औराद शहाजानी हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.

धुक्यात शाेधावा लागताेय महामार्ग...
वातावरणात बदल झाल्याने पहाटेपासून तेरणा काठासह औराद परिसरात धुक्याची चादर पसरत आहे. मागील आठवड्यात धुक्यात लातूर-जहिराबाद महामार्गावर वाहन चालकांना रस्ता शाेधावा लागला होता. नदीकाठच्या भागात पहाटे धुके, दवबिंदू पडणे हे नित्याचे झाले आहे. पिकांना थंडी बाधली असून किमान तापमान दहा अंशाच्या आत आल्याने पिके पिवळी पडली आहेत, अन्न प्रक्रिया मंदावली आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थंडावली असल्याने पिकांची फुल व फळगळ वाढली असल्याचे शेतकरी विठ्ठल अंचुुळे म्हणाले.

थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्या...
मंडळ कृषी अधिकारी रणजित राठाेड म्हणाले, बागेत सांयकाळी व पहाटे शेतकऱ्यांनी धुर करावा. शक्य असेल तर रात्री पाणी द्यावे. फळबागांना सल्फरचा खताचा डाेस द्यावा. दरम्यान, वाढत्या थंडीने औराद शहाजानीसह परीसरातील गावात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकाेट्या पेटविल्या जात आहेत. गरम उलनचे कपडे, कानटाेपीचा वापर करुन नागरिक थंडीपासून बचाव करत आहेत. लहान बाळ व वयस्कर नागरिकांना घराबाहेर लवकर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Web Title: Minimum temperature at 7.5 degrees; Crops are affected by cold, risk of outbreak of various diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.