औराद शहाजानीचे किमान तापमान ९ अंशावर; सकाळी ११ पर्यंत रस्त्यावर शुकशुकाट

By संदीप शिंदे | Published: November 29, 2024 07:03 PM2024-11-29T19:03:35+5:302024-11-29T19:04:18+5:30

विशेष म्हणजे, पुढील दोन दिवस तापमानात आणखीन घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Minimum temperature of Aurad Shahjani at 9 degrees; no one on the streets till 11 am | औराद शहाजानीचे किमान तापमान ९ अंशावर; सकाळी ११ पर्यंत रस्त्यावर शुकशुकाट

औराद शहाजानीचे किमान तापमान ९ अंशावर; सकाळी ११ पर्यंत रस्त्यावर शुकशुकाट

औराद शहाजनी (जि. लातूर) : गेल्या आठवड्यापासून थंडीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे औराद शहाजानीसह परिसरातील किमान तापमानाची ९ अंश सेल्सिअस नोंद झाली असून, १० अंशाच्या आत तापमान आल्याने पिकांना थंडी बाधली आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.

औराद शहाजानीसह परिसरातील गावांत यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे तेरणा, मांजरा नद्यांसह सर्वच साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे शुक्रवारी या भागातील तापमान ९ अंशापर्यंत खाली आल्याची नोंद येथील हवामान केंद्रावर झाली आहे. विशेष म्हणजे, पुढील दोन दिवस तापमानात आणखीन घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम कर्नाटक सीमा भागासह मराठवाड्यात होऊन ढगाळ वातावरण होण्याबरोबर काही भागात अल्पसा तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान केंद्राच्या वतीने वर्तविण्यात आले आहे.

परिणामी, या भागातील तापमान वाढणार असून, आर्द्रतेतही वाढ होणार आहे. परिणामी, थंडीचा कडाका रविवारपासून कमी होणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून या भागात थंडीचा जोर कायम असून, पाच दिवसांपासून किमान व कमाल तापमानाचा पारा खाली घसरला आहे. शुक्रवारी सकाळीचे किमान तापमान ९ अंशापर्यंत तर कमाल तापमान २८ अंशापर्यंत नीचांकी स्तरावर घसरले असल्याची नोंद येथील हवामान केंद्रावर झाल्याचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.

काही दिवसांतील तापमानाची नोंद...
औराद शहाजानी येथील हवामान मापक केंद्रावर २२ नोव्हेंबर रोजी किमान १२.५, कमाल ३०.५ अं. से. असे नोंदले. २३ रोजी किमान १२ तर कमाल ३०, २४ रोजी किमान ११.५ तर कमाल २९.५, २५ रोजी किमान ११ तर कमाल २८.५, २६ रोजी किमान ११, कमाल २९, २७ नोव्हेंबर रोजी किमान ११, कमाल २९, २८ रोजी किमान १० तर कमाल २८ अंश आणि २९ रोजी किमान तापमान ९ तर कमाल २८ अंश असे नोंदले गेले आहे.

Web Title: Minimum temperature of Aurad Shahjani at 9 degrees; no one on the streets till 11 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.