तेरणा काठचे किमान तापमान ७.५ अंशांवर, पिकांना थंडी बाधली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:17+5:302020-12-22T04:19:17+5:30
औराद शहाजानीसह परिसरात ढगाळ वातावरणानंतर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. सकाळी ...
औराद शहाजानीसह परिसरात ढगाळ वातावरणानंतर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. सकाळी उशिरापर्यंत अंगातून हुडहुडी जात नाही. सकाळी उन्हाचा पारा वाढल्यानंतर थंडीची तीव्रता कमी हाेत आहे.
औराद शहाजानीसह परिसरात यंदा चांगला पाऊस झाला होता. या भागातून वाहणाऱ्या तेरणा, मांजरा नद्यांना पूर आला हाेता. या नद्यांवरील औराद, तगरखेडा, वांजरखेडा, साेनखेड, गुंजरगा, मदनसुरी यासह सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. शिवाय, सर्वच लघु व मध्यम तलाव भरले आहेत. त्यामुळे रबी हंगामात पेरा वाढला आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही पिके जोमात आली आहेत. शनिवारी औराद केंद्रावर किमान तापमान १४.५ अंश से. हाेते, तर रविवारी तापमानाचा पारा खाली उतरून १० अंश से.वर आला होता. त्यामुळे वातावरणात गारवा हाेता.
औराद हवामान केंद्रावरील नाेंदी...
वार किमान कमाल
साेमवार ७.५ २८.५
रविवार १०.०० २९.५
शनिवार १४.५ ३०.५
शुक्रवार १६.० ३०.५
फुलगळ वाढली...
किमान तापमानाचा पारा १० अंश से. च्या आत आल्यानंतर पिकांची वाढ काही काळासाठी खुंटते. फळबागेत रात्री धूर करून थंडीपासून थाेडा बचाव करता येताे.
- एच.एम. पाटील, मंडळ कृषी अधिकारी.
भुरी, दावणीचा प्रादुर्भाव...
सततचे ढगाळ वातावरण आणि मध्येच एकदम थंडी, या दाेन्हीमधील तापमानात हाेणाऱ्या चढ-उताराने फळबाग व भाजीपाल्याची फुलगळ झाली आहे. आता एकदम वाढीव थंडीमुळे पिकांची वाढ खुंटून धुक्यामुळे भुरी, दावणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यापूर्वी तापमान वाढल्याने लालकाेळी राेगाचा प्रादुर्भाव झाला होता.
- भागवत बिरादार, शेतकरी, तगरखेडा.
उबदार कपड्यांची खरेदी...
वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक टाेपी, स्वेटर असे उबदार कपडे खरेदी करीत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात गल्लाेगल्ली शेकाेट्या पेटत आहेत. सकाळी उन्ह पडल्यानंतरच नागरिक घराबाहेर पडत आहेत.
आणखी थंडी वाढेल...
येत्या काही दिवसांत ही थंडी कायम राहील. पुढील तीन-चार दिवस पारा खाली उतरण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान केंद्राने वर्तविला आहे.