मंत्री संजय बनसोडे यांचे उदगीरमध्ये जंगी स्वागत; ठिकठिकाणी जल्लाेष, हजाराे कार्यकर्त्यांची उपस्थिती...
By राजकुमार जोंधळे | Published: July 15, 2023 03:37 AM2023-07-15T03:37:05+5:302023-07-15T03:39:24+5:30
यावेळी उदगीरात मोठे पुष्पहार अर्पण करून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.
उदगीर - राज्याच्या मंत्रिमंडळात क्रीडा व युवक कल्याण आणि बंदरे मंत्री म्हणून संधी मिळालेल्या आमदार संजय बनसोडे यांचे शुक्रवारी उदगीर शहरात आगमन होताच जंगी स्वागत झाले. जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची मुक्त उधळण करण्यात आली. यावेळी उदगीरात मोठे पुष्पहार अर्पण करून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.
क्रीडा व युवक कल्याण आणि बंदरे मंत्री संजय बनसोडे यांचे उदगीर तालुक्यात आगमन होताच डिग्रस, करडखेल, लोहारा आणि मलकापूरच्या ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करत वाजतगाजत स्वागत केले. उदगीर शहरातील उमा चौकामध्ये मंत्री बनसोडे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत वाजतगाजत कार्यकर्त्यांनी स्वागत केले. माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, रामचंद्र तिरुके, बापूराव राठोड, मनोहर भंडे, रामचंद्र मुक्कावार, गणेश गायकवाड, उदयसिंह ठाकूर, माजी सभापती मुन्ना पाटील, भरत चामले, पद्माकर उगीले, रिपाइंचे देविदास कांबळे, पप्पू गायकवाड, शेख समीर यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती हाेती.
ग्रामदैवताचे घेतले दर्शन...
क्रीडा व युवक कल्याण आणि बंदरे मंत्री संजय बनसोडे, त्यांच्या सुविद्य पत्नी शिल्पाताई बनसोडे यांनी उदगीर शहरातील ऐतिहासिक किल्ल्यातील ग्रामदैवत उदगीर बाबा महाराजांचे दर्शन घेतले. सदरोद्दीन बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवली. उदगीरातील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. झाकीर हुसेन, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा गांधी, महात्मा बसवेश्वर, वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.