लातूर जिल्ह्यात मंत्रिपद दोघांना? जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार महायुतीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:42 PM2024-11-28T12:42:08+5:302024-11-28T12:44:38+5:30
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळातही राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री पदे लातूरला मिळाली आहेत.
लातूर : जिल्ह्यातील मतदारांनी भरघोस कौल देत सहापैकी पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून दिले आहेत. पूर्वानुभव, पक्षातील कारकीर्द लक्षात घेऊन जिल्ह्यात किमान दोघांची मंत्रिपदी वर्णी लागेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. महायुतीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
काळजीवाहू सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणारे संजय बनसोडे हे उदगीरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी अपेक्षा उदगीरकरांची आहे. पहिल्याच टर्ममध्ये ते आमदार, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीही झाले होते. सामाजिक समतोल साधण्यासाठी पक्षाकडून त्यांचे नाव पुन्हा पुढे येईल, अशी चर्चा आहे. भाजपाकडून माजी मंत्री आ. संभाजी पाटील - निलंगेकर यांचे नाव प्रथम क्रमांकावर चर्चेत आहे. ते मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. बनसोडे आणि निलंगेकर या दोन प्रमुख नावांशिवाय नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार झाला तर औसा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आ. अभिमन्यू पवार यांचे नाव भाजपाकडून पुढे येऊ शकते. तसेच लातूर ग्रामीणमधून आलेले भाजपाचे आ. रमेश कराड विधान परिषदेवर आमदार आहेत. आता ते विधानसभेवर निवडून आले असून, त्यांनी अटीतटीची लढाई जिंकली आहे. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते अपेक्षा व्यक्त करीत आहेत. अहमदपूरचे आ. बाबासाहेब पाटील हे सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तीनवेळा आमदार झाले आहेत. राष्ट्रवादी (अप) मधून त्यांच्या नावाची चर्चा जिल्ह्यात होत आहे.
जिल्ह्याचा कौल सत्तेकडे
लातूरला कायम मंत्रिपदे राहिली आहेत. काँग्रेस काळात केंद्रात अनेक खात्यांचे मंत्री, राज्यात मुख्यमंत्री तसेच बहुतांश खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद लातूरकडे राहिले आहे. युती आणि महायुतीच्या काळातही राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री पदे लातूरला मिळाली आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस कौल असून, पाच आमदार निवडून आले असून, लातूरचे किमान एक - दोन मंत्री असणार, याला पुष्टी मिळत आहे. मात्र, त्याचवेळी महायुतीचे स्थिर सरकार आले असून, राज्यभरातून दावेदारांची संख्या लक्षात घेता दोन्ही पक्षांना संधी मिळणार की एकावरच समाधान मानावे लागणार, हा पेच आहेच.