चाेरीतील ९ दुचाकींसह अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात
By राजकुमार जोंधळे | Published: March 31, 2024 07:01 PM2024-03-31T19:01:51+5:302024-03-31T19:02:13+5:30
तीन गुन्हे उघड : साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
राजकुमार जाेंधळे / लातूर : चाेरीतील ९ दुचाकींसह एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील चाेरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश दिले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली. त्यानुसार रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. एक मुलगा चोरीतील दुचाकी विक्रीसाठी एमआयडीसी परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली.
एमआयडीसी परिसरात पाेलिस पथकाने धाव घेतली. रस्त्यावर थांबलेल्या मुलाला दुचाकीसह विश्वासात घेत विचारपूस केली. ताे काटगाव (ता. लातूर) येथील अल्पवयीन मुलगा असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेत कसून चाैकशी केली असता, जप्त केलेली दुचाकी २०२१ मध्ये येलोरी (ता. औसा) शिवारातून चाेरल्याचे उघड झाले. शिवाय, काही महिन्यांपूर्वी लातुरातील विविध भागातून आठ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
ही कारवाई स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले, राहुल सोनकांबळे, राहुल कांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, मनोज खोसे, नितीन कटारे, संतोष खांडेकर, युवराज गिरी, बेल्लाळे, अर्जुन राजपूत, मुन्ना मदने यांच्या पथकाने केली.