अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार; आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:29 IST2025-01-30T16:29:42+5:302025-01-30T16:29:57+5:30

अहमदपूरच्या विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Minor girl kidnapped and tortured; Accused sentenced to hard labor | अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार; आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार; आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

लातूर : अहमदपूर तालुक्यातील चोबळी येथील बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला अहमदपूर विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा वर्षे सक्तमजुरी, तीस हजार रुपये दंड तसेच कलम ८ पोस्को अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी व तीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

चोबळी येथील रोहित रणधीर पाटील याने १४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडिता व तिची आई घरी जेवण करीत असताना दरवाजा वाजवला. पीडितेच्या आईने दार उघडले. तेव्हा रोहित पाटील याने पीडितेच्या आईला धक्का देऊन अल्पवयीन पीडित मुलीला घेऊन पळून गेला. त्यानंतर घरच्यांनी आरोपी व पीडितेचा शोध घेतला असता नांदेड मार्गे आळंदी येथे घेऊन गेला. लग्नाचे खोटे आमिष दाखवून रात्री व दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. अहमदपूर पोलिसांनी शोध घेऊन आरोपी व पीडितेला ताब्यात घेतले. आरोपी रोहित रणधीर पाटील याच्या विरुद्ध अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अहमदपूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यात पीडित अल्पवयीन मुलगी, पीडितेची आई, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी के. एस. पठाण यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र वडगावकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील महेश पाटील यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तपासात पोलिस पैरविकार, हेडकॉन्स्टेबल गोविंद पवार यांनी सहकार्य केले.

पुरावे ग्राह्य धरुन शिक्षा
सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी रोहित रणधीर पाटील यास कलम ३६३ भादंवि अन्वये सहा वर्षे सक्तमजुरी, तीस हजार रुपये दंड, बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याचे कलम आठ खाली पाच वर्षे सत्तामजुरी व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

Web Title: Minor girl kidnapped and tortured; Accused sentenced to hard labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.