वर्षभरापासून गायब मुलीचा लागला शाेध; वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश
By राजकुमार जोंधळे | Published: July 10, 2023 08:10 PM2023-07-10T20:10:01+5:302023-07-10T20:10:53+5:30
लातूरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश
लातूर : जिल्ह्यातील कासार शिरसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २०२२ मध्ये एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. दरम्यान, याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. वर्षभरानंतर गायब मुलीचा शोध लावण्यात अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला (एएचटीयू) यश आले आहे.
पोलिसांनी सांगितले, २०२२ मध्ये कासारशिरसी ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून कासारशिरसी ठाण्याचे पोलिस गायब असलेल्या मुलीचा शोध घेत होते. मात्र, तिचा ठावठिकाणा काही लागत नव्हता. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गायब झालेल्या मुला-मुलींचा शोध घेण्याचे आदेश अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला दिले होते. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकामार्फत समांतर शोध सुरु होता. याचा तपास सुरु असताना अपहरण झालेल्या मुलीचा राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन शोध घेतला. तसेच, सायबर सेलच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे गायब मुलीचा शोध घेतला. तिच्यासह अन्य एकाला कासारशिरसी पोलिस ठाण्यात हजर केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलिस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलिस हेड कॉन्स्टेबल सदानंद योगी, पोलिस नाईक गिरी, चालक बुढे यांच्यासह सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले.