दाेन वर्षांपासून गायब मुलीचा लागला शाेध; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला यश
By राजकुमार जोंधळे | Published: January 13, 2024 07:37 PM2024-01-13T19:37:39+5:302024-01-13T19:38:10+5:30
२०२२ मध्ये मुरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अल्पवयीन मुलीचे अपरहण केल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली हाेती.
लातूर : जवळपास दाेन वर्षांपासून एका बेपत्ता मुलीचा शाेध घेण्यात लातूरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (एएचटीयू) पथकाला यश आले आहे.
पाेलिसांनी सांगितले, २०२२ मध्ये मुरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अल्पवयीन मुलीचे अपरहण केल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली हाेती. याबाबत कलम ३६३ भादंविप्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस ठाण्याच्या पथकाने या मुलीचा शाेध सुरू केला हाेता. मात्र, ती हाती लागत नव्हती. याबाबत जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बेपत्ता, अपहरण झालेल्या मुला-मुलींच्या शाेधाबाबत विशेष माेहीम हाती घेण्याचे आदेश दिले हाेते. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला सूचना केल्या.
अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे (AHTU) पोलिस निरीक्षक करण सोनकवडे, पोलिस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलिस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांच्या पथकाच्या वतीने या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात आला. यातील अपहरण झालेल्या मुलीचा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात शोध घेतला. शिवाय, सायबर सेलच्या मदतीने मिळालेल्या माहितीवरून विविध ठिकाणी मुलींचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. ही कारवाई अंमलदार प्रवीण जाधव, सदानंद योगी, मापोना गिरी, चालक बुढे त्याचबराेबर सायबर सेलच्या पथकाने केली आहे.