पदाचा गैरवापर करणे आले अंगलट, कोपरा येथील सरपंच, उपसरपंच ठरले अपात्र !
By राजकुमार जोंधळे | Published: October 22, 2022 04:51 PM2022-10-22T16:51:05+5:302022-10-22T16:52:40+5:30
अपर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचा आदेश
किनगाव (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील कोपरा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच हे २०१७ पासून आपल्या पदाचा दुरुपयोग करून गावात बेकायदेशीर काम करत असल्याचे अर्जदारांनी तक्रार दाखल केली हाेती. या अर्जावर मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांच्यासमोर वेळाेवेळी सुनावणी घेण्यात आली असता, प्रतिवादी सरपंच आणि उपसरपंच हे नोटीस देऊनही सुनावणीस हजर राहिले नाहीत. परिणामी, या प्रकरणात १२ ऑक्टाेबर २०२२ रोजी अर्जदाराचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रकरण निकालासाठी राखून ठेवण्यात आले हाेते. तर उपसरपंचाविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सरपंच आणि उपसरपंच या नात्याने आपले कर्तव्य पार पाडत असताना पदाचा दुरुपयोग केल्याचे सिद्ध होत असल्याने सरपंच आणि उपसरपंच यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये अपात्र करण्याची शिफारस जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली. सरपंच आणि उपसरपंचांनी गावातील पाणीपुरवठ्यासाठी असलेली इंधन विहीर पाडून ग्रामपंचायत व शासनाचे नुकसान केले. त्यामुळे त्यांना पदावरून अपात्र करण्यात यावे, अशी मागणी अर्जदाराने केली हाेती.
सरपंच आणि उपसरपंच यांनी गावातील अतिक्रमण हटवताना पोलिसांचा बंदोबस्त न घेता अतिक्रमण हटवले. एकतर्फी घाईघाईने अतिक्रमण काढण्याची कारवाई करून कर्तव्यात कसूर केला असून, अतिक्रम काढताना सार्वत्रिक मालमत्ता पाणीपुरवठ्याच्या बोअरचे नुकसान केले. या प्रकरणात सरपंच गंगाधर देपे आणि उपसरपंच बालाजी आचार्य यांनी तरतुदींचा भंग केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंच यांना अपात्र ठरवण्यात आल्याचे अप्पर विभागीय आयुक्त क्र. १ औरंगाबाद यांनी कळविले आहे.