लातूरात न्यूरोलॉजिकल थेरपीसाठी मोबाइल क्लिनिक पोहोचले अंगणवाडीत
By हरी मोकाशे | Published: August 6, 2024 12:52 PM2024-08-06T12:52:38+5:302024-08-06T12:52:56+5:30
लातूरात जिल्हा परिषद व ‘उमंग’चा देशातील पहिला ‘अनमाेल’ उपक्रम
लातूर : न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर व थेरपीसाठी मोनोबस मोबाइल क्लिनिक व थेरपी सेंटरचा देशातील पहिला ‘अनमोल’ उपक्रम लातूर जिल्हा परिषद व उमंग रिसर्च सेंटरने राबविला आहे. ज्याद्वारे प्रत्येक अंगणवाडीपर्यंत जाऊन मुलांची तपासणी व लवकर निदान शक्य झाले आहे.
लातूर जिल्हा परिषद आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठान संचलित देशातील पहिले उमंग इन्स्टिट्यूट ऑफ ऑटिझम ॲण्ड मल्टिडिसॅबिलिटी रिसर्च सेंटर मागील काही वर्षांपासून लातूरमध्ये सुरू आहे. येथे मानसिक व शारीरिक दुर्बल बालकांसाठी सर्व प्रकारच्या न्यूरॉलॉजिकल तपासण्या, उपचार तसेच अर्ली इंटरवेन्शन, ॲक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, बिव्हेरियल थेरपी, रेमेडियल थेरपी, सेन्सरी इन्टिग्रेशन थेरपी, हायड्रो थेरपी, ओएई, ईईजी, बेरा, पीटीए उपचार पद्धती सुरू आहेत. त्याचा पुढचा टप्पा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनानुसार वन स्टॉप सोल्यूशन फॉर चाइल्ड ॲण्ड वूमन्स अंतर्गत ‘उमंग ऑन व्हिल्स’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीपर्यंत पोहोचविला जात आहे. मोनोबसचे परिवर्तन मोबाइल क्लिनिक व थेरपी सेंटरमध्ये करून न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आणि थेरपीसाठी रुग्णांच्या दारात जाणारे हे देशातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे.
२५० पेक्षा अधिक मुलांना ऑटिझम विकार...
‘उमंग ऑन व्हिल्स’च्या माध्यमातून ५० हून अधिक अंगणवाडी, १० खासगी पूर्वप्राथमिक इंग्रजी शाळांमधील ६ हजार ५०० हून अधिक मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात २५० पेक्षा जास्त मुलांना ऑटिझम आणि ऑटिझम स्पेक्ट्रम विकार असल्याचे निदान झाले. तसेच १५० पेक्षा अधिक मुले इतर न्यूरोलॉजिकल विकाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन महिन्यांपासून उपचार सेवा...
ही उपचार सेवा दोन महिन्यांपासून सुरू आहे. लहान मुलांचे मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत उटगे यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने उपचार सेवेला गती दिली आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामपंचायतींची मदत मिळत आहे.
मुलांचा दिव्यांग होण्यापासून बचाव...
‘उमंग ऑन व्हिल्स’च्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रापर्यंत जाऊन बालकांची मानसिक तपासणी करण्यात येत आहे. वेळीच तपासणीमुळे लवकर निदान होईल व तत्काळ उपचार केल्यामुळे मुलांना दिव्यांग होण्यापासून वाचवता येईल. त्यामुळे मुलांची शारीरिक, मानसिक प्रगती होण्याबरोबरच बुद्धिमत्ताही वाढेल.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद