मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले; आठवडी बाजार, गर्दीत चोरटे सक्रिय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:14 AM2021-07-05T04:14:11+5:302021-07-05T04:14:11+5:30
५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही लातूर जिल्ह्यात प्रवासादरम्यान, भाजी मंडई, प्रमुख बाजारपेठ आणि आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे ...
५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही
लातूर जिल्ह्यात प्रवासादरम्यान, भाजी मंडई, प्रमुख बाजारपेठ आणि आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरट्यांकडून पळविले जातात. यांतील जवळपास मोबाईलचा शोध लागत नसल्याचा तक्रारदारांना अनुभव आहे. तक्रार केल्यानंतर महिना, दोन महिन्यांनंतर नागरिकही पाठपुरावा करीत नाहीत. केला तरी ते हतबल ठरतात.
मोबाईल चोरणाऱ्या स्वतंत्र टोळ्या
शहरातील गर्दीच्या ठिकाणी, प्रमुख बाजारपेठ आणि ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईल चोरणाऱ्या स्वतंत्र टोळ्या सक्रिय आहेत. यामध्ये काही अल्पवयीन गुन्हेगारांचाही समावेश आहे. ज्या भागात आठवडी बाजार आहे, त्या भागातील ठाण्यांत मोबाईल चोरीच्या तक्रारी दाखल होतात. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास केला जातो. काही कळण्याच्या आतच हे चोरटे पसार होतात.
मोबाईल चोरीस जाताच तातडीने हे करा
एखाद्या नागरिकाचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर त्याने तातडीने संबंधित पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करावी. प्रारंभी सिमकार्ड बंद करून टाकावे. मोबाईलमधील सर्व प्रकारचे पासवर्ड बदलून टाकावे. ऑनलाईन बँकिंग असल्यास तातडीने बँकेला माहिती देऊन व्यवहार बंद करावा. यातून चोरीला गेलेल्या मोबाईलचा गैरफायदा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
सायबर सेलकडून चोरीचा तपास
मोबाईल चोरीच्या तक्रारी ठाणे स्तरावर दाखल होतात. तेथून सायबर सेलकडे माहिती पुरविली जाते. मोबाईल चोरी प्रकरणाचा तपास सायबर सेलकडूनही केला जातो. चोरीतील मोबाईल कोणी वापरत असेल तर लोकेशन तपासले जाते. त्या अनुषंगाने आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सायबरची मदत होते.
- निखिल पिंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर.
हेल्पलाईनची मदत घ्या
मोबाईल फोन हरविल्यानंतर किंवा चोरीला गेला तर तातडीने हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर तुमची तक्रार नोंदविण्यात येते. त्याचबरोबर मोबाईलचे नेटवर्क बंद होते. आयएमईआय क्रमांकावरून ऑपरेटर्स नेटवर्क ब्लॉक करू शकतील. ज्यातून मोबाईलचा गैरवापर होणार नाही.
लातूर जिल्ह्यात यापूर्वी आयएमईआय क्रमांक बदलण्याचे प्रकारही घडले आहेत. या प्रकरणी यापूर्वी लातुरातून पोलिसांनी काहीजणांना अटक केली होती. चोरीतील मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी असे प्रकार केले जातात. त्यातून तपासामध्ये अडचणी येतात.