लातूरात दुचाकींसह माेबाईल पळविणारी टाेळी जेरबंद; २१ माेबाईल, ११ दुचाकी जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: January 31, 2024 07:40 PM2024-01-31T19:40:43+5:302024-01-31T19:43:02+5:30
सहा जणांना अटक : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त...
लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकीसह माेबाईल पळविणारी टाेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली असून, त्यांच्याकडून २१ माेबाईल, ११ दुचाकी, १ लॅपटाॅप असा एकूण ८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आठ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, सहा जणांना अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील एमआयडीसी ठाण्यात दुचाकी चाेरीप्रकरणी तक्रार दाखल केली हाेती. शिवाय, अन्य पोलिस ठाण्यांच्या हद्दीतूनही दुचाकी, माेबाईल पळविल्याच्या घटना घडल्या हाेत्या. या गुन्ह्यातील आराेपींच्या अटकेसाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने चाेरट्यांचा शाेध सुरु केला. पथकाला दुचाकी, माेबाईल चाेरी करणाऱ्या आराेपींची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे दुचाकी, माेबाईल चाेरुन ते कमी किंमतीत विक्री करणाऱ्या आरोपींची टोळी निष्पन्न झाली. टोळीतील सदस्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून उचलण्यात आले.
अक्षय प्रभाकर कणसे (वय २८, रा. वाल्मिकी नगर लातूर), समाधान बाळासाहेब जाधव (वय २०, रा. काडगाव, ता. लातूर), सद्दाम हुसेन शेख (वय २४, रा. पळसप, जि. धाराशिव), राम उर्फ लखन सुधाकर संदीले (वय २४ रा. प्रकाश नगर, लातूर), महेश नामदेव नरहरे (वय २१, रा. महाळंग्रा ता. चाकूर) आणि आशिष गोविंद पवार (वय २४, रा. माळुंब्रा, ता. औसा) अशी त्यांची नावे आहेत. अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर तिघा साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तब्ब्ल ८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, रियाज सौदागर, मोहन सुरवसे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, राहुल सोनकांबळे, मनोज खोसे, राहुल कांबळे, नितीन कठारे, संतोष खांडेकर, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.