१६ विद्यार्थीनींचा विनयभंग; लातूरात झेडपीच्या एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 07:27 PM2024-12-02T19:27:45+5:302024-12-02T19:30:04+5:30
लातूर जिल्ह्यातील एका गावात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने १६ विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची तक्रार पाेलिस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.
लातूर : १६ विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याच्या आराेपाखाली जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाविराेधात पाेलिस ठाण्यात पाेस्काे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील एका गावात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने १६ विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची तक्रार पाेलिस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, अण्णा श्रीरंग नरसिंगे (वय ४५ रा. लातूर) हा एका गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कार्यरत हाेता. दरम्यान, त्यांनी मार्च २०२१ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत शाळेतील विद्यार्थींनींना अश्लिल बाेलणे, अपमानस्पद बाेलून, असभ्य वर्तन करत विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एकूण १६ विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचे फिर्यादीने पाेलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
याबाबत पाेलिस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी निवृत्ती माराेतीराव जाधव (वय ५६ रा. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अण्णा श्रीरंग नरसिंगे याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पाेलिस एस.जी. द्राेणाचार्य हे करीत आहेत.
विशाखा समितीने साधला मुलींशी संवाद
जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील पीडित मुलींशी विशाखा समितीच्या सदस्यांनी संवाद साधत जबाब नाेंदविले आहेत. यामध्ये विनयभंग झाल्याचा प्रकार समाेर आला असून, याबाबत संबंधित पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पाेस्काे कायद्यानुसार गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.