अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आराेपीस तीन वर्षांचा कारावास
By राजकुमार जोंधळे | Published: November 29, 2022 05:40 PM2022-11-29T17:40:00+5:302022-11-29T17:41:30+5:30
लातूर न्यायालयाचा निकाल; चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील प्रकरण
लातूर : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी (पाेस्काे) नळेगाव येथील आराेपीला तीन वर्षांचा कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा लातूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे एका अल्पवयीन पीडित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चाकूर पाेलिस ठाण्यात २३ नोव्हेंबर २०२० रोजी रहीम इब्राहिम तांबोळी-शेख (वय ३८, रा. नळेगाव, ता. चाकूर) यांच्याविराेधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३८ / २०२० कलम ३५४, (ए) ४५२, ५०६ भादवी आणि ७, ८, ९ (क), १० लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, तत्कालीन तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांनी गुन्ह्याचा तपास केला. गुन्ह्यातील आरोपीला तातडीने अटक करून, जबाब नाेंदविले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून, गुन्ह्याच्या अनुषंगाने पंचनामा, प्रत्यक्ष साक्षीदार आणि इतर पुरावे जमा केले. हाती आलेले पुरावे लातूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
साक्ष, पुरावे महत्त्वपूर्ण ठरले...
सुनावणीअंती पोलिसांनी लातूरच्या न्यायालयात दाखल केलेले पुरावे, तपास अधिकारी, पंच आणि प्रत्यक्ष साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. याप्रकरणी लातूर न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बी. सी. कांबळे यांनी २१ नाेव्हेंबर २०२२ राेजी आरोपी रहीम इब्राहिम तांबोळी-शेख याला तीन वर्षांचा कारावास आणि एक हजारांचा दंड अशी शिक्षा ठाेठावली आहे.
उपलब्ध पुराव्याच्या आधारे शिक्षा...
तत्कालीन तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात सबळ पुरावे जमा केले. खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी केलेल्या युक्तिवादावरून लातूर न्यायालयाने आरोपीस शिक्षाही सुनावली आहे. गुन्ह्यामध्ये चाकूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते, मॉनिटरिंग सेलचे सपोनि. बालाजी तोटेवाड यांनी केले. तर चंद्रकांत राचमाले यांनी पैरवी केली.