वानराचा हल्ला, ५० जखमी! वनविभागाचा गावाला घेराव; घराबाहेर पडू नका, ग्रामपंचायतीची दवंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 11:07 AM2022-11-26T11:07:55+5:302022-11-26T11:12:25+5:30
सोनखेड येथे वानराला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक गावात गस्त घालत असून, वानराच्या मार्गावर जाळे टाकण्यात आले आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत वानर वनविभागाच्या हाती लागले नव्हते.
औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील सोनखेड येथे तीन दिवसांपासून एका वानराने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या वानराने ५० जणांना जखमी केले असून, यातील दोनजण गंभीर आहेत. या वानराला पकडण्यासाठी वनविभागाचे ५० हून अधिक कर्मचारी गावात दाखल झाले असून, त्यांनी गावाला घेराव घातला आहे.
सुरुवातीला वानराने एक-दोघांना चावा घेतल्याने ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. मात्र, गुरुवारपासून हा वानर माणूस दिसताच त्याच्यावर हल्ला करून जखमी करीत आहे. आतापर्यंत ५० जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामपंचायत व वनविभागाने गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. निलंगा तहसीलदारांना परिस्थितीबाबत कळविले असल्याचे सरपंच नागनाथ स्वामी यांनी सांगितले.
जाळे टाकून पकडण्याचा प्रयत्न -
सोनखेड येथे वानराला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक गावात गस्त घालत असून, वानराच्या मार्गावर जाळे टाकण्यात आले आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत वानर वनविभागाच्या हाती लागले नव्हते.