मराठवाडा शिक्षक संघाचा धडक मोर्चा, विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या
By हणमंत गायकवाड | Published: September 18, 2022 04:09 PM2022-09-18T16:09:01+5:302022-09-18T16:09:56+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून काढलेल्या या मोर्चामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लातूर :
राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा, वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित सूत्रानुसार अनुदान देण्यात यावे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाने जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी धडक मोर्चा काढला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून काढलेल्या या मोर्चामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंब निवृत्ती योजना लागू करावी, १०, २०, ३० अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र दिकानांकापासून देण्यात यावी, तासिका तत्वावर अल्प मानधनावर काम करीत असलेल्या प्राध्यापकांना नियमित प्राध्यापक म्हणून मान्यता देण्यात यावी, शिक्षकांच्या नियुक्त्या स्वयंसेवक म्हणून करण्याचा ठराव भंडारा जिल्हा परिषदेने घेतला आहे, तो ठराव शिक्षकांचा अवमान करणारा आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष पी.एस. घाडगे यांच्यासह विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, राजकुमार कदम, विश्वंभर भोसले, एन.जी. माळी, जी.जी. रातोळे, मधुकर जोंधळे, बी.व्ही. स्वामी, सी.व्ही. माचपल्ले, जी.व्ही. माने, अविनाश सावंत, एन.एस. माळगे, राजकुमार नामवाड, शिवाजी मादलापुरे, प्रवीण माने, आर.बी. सावंत, अंकुश देवकते, अहेलु बुरनापल्ले, डी.जी. मोरे आदींसह शेकडो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते.