'खो-खो' खेळात दिसणार अधिक चपळाई; संघात असणार आता १२ ऐवजी १५ खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 05:54 PM2022-02-03T17:54:19+5:302022-02-03T17:55:09+5:30
'Kho-Kho' sport: आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक खो-खो वाढविण्यासह खेळात होत असलेल्या दुखापतीमुळे अनेक संघावर अन्याय होत होता.
- महेश पाळणे
लातूर : महाराष्ट्राचा खेळ असलेला खो-खो अधिक वेगवान होणार आहे. भारतीय खो-खो महासंघाने आता संघात १२ ऐवजी १५ अशी खेळाडूंची संख्या केली आहे. त्यामुळे वेगासह या खेळात आता चपळाईही अधिक प्रमाणात दिसणार आहे. या निर्णयाने जिल्ह्याच्या खो-खो क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक खो-खो वाढविण्यासह खेळात होत असलेल्या दुखापतीमुळे अनेक संघावर अन्याय होत होता. त्यामुळे भारतीय खो-खो महासंघाने संघातील खेळाडूंच्या संख्येत वाढ केली असून, आता १२ ऐवजी १५ खेळाडू संघात दिसणार आहेत. यात नऊ खेळाडू मुख्यत: खेळणार असून, उर्वरित सहा खेळाडू राखीव राहणार आहेत. त्यामुळे खो-खो खेळातील राखीव फळीलाही मजबुती मिळाली आहे. बुधवारी महासंघाचे जनरल सेक्रेटरी एम.एच. त्यागी यांनी याबाबत सर्व मान्यताप्राप्त राज्यातील असोसिएशन यांना पत्राद्वारे कळविले आहे. यात सबज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर गटातील पुरुष व महिला संघांचा समावेश असणार आहे. यात १५ खेळाडूंसह एक प्रशिक्षक, एक व्यवस्थापक, एक सपोर्टिंग स्टाफ व एका फिजिओचा समावेश असणार आहे. आगामी काळातील स्पर्धेसाठी हा नियम लागू राहणार आहे. त्यामुळे खो-खो क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
राखीव फळी होणार मजबूत...
पोल मारताना किंवा दुसऱ्या संघातील गडी बाद करताना सूर मारल्यानंतर खो-खो खेळात अनेकवेळा खेळाडू जखमी व्हायचे. त्याचा तोटा संघाला होत असे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह तीन खेळाडू पूर्वी राखीव असायचे. आता यात वाढ होऊन ही संख्या सहावर गेली आहे. त्यामुळे लवचिकता, वेग व चपळाई या खेळात अधिक प्रमाणात दिसेल.
खो-खो होणार वेगवान...
खेळाडूंची संख्या वाढल्याने संघाला बळ मिळणार आहे. एखादा खेळाडू जखमी झाला तरी त्याला आता पर्याय राहणार असून, या निर्णयाने खो-खो खेळ अधिक वेगवान होईल. - चंद्रकांत लोदगेकर, खो-खो प्रशिक्षक
चांगल्या खेळाडूंना मिळणार संधी...
पूर्वी संघात १२ खेळाडू असायचे. संख्याबळ वाढविल्याने अधिकच्या तीन खेळाडूंना संधी मिळणार आहे. अनेकवेळा उत्कृष्ट खेळाडूंना संधी मिळत नव्हती. मात्र खेळाडूंची संख्या संघात वाढल्याने त्यांची सोय झाली आहे. - प्रकाश आयरेकर, राष्ट्रीय खो-खो पटू