देवणी तालुक्यात महिला उमेदवार अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:24+5:302021-01-13T04:49:24+5:30
देवणी : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या २१२ जागांसाठी निवडणूक होत आहे. या गावांत महिला उमेदवार २७३, तर पुरुष उमेदवार २३२ ...
देवणी : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या २१२ जागांसाठी निवडणूक होत आहे. या गावांत महिला उमेदवार २७३, तर पुरुष उमेदवार २३२ आहेत. महिला उमेदवार अधिक आहेत. प्रचारासाठी दिवस कमी असल्याने जोरदार प्रचार सुरू आहे. त्यामुळे गावागावांत चुरस दिसून येत असून, स्थानिक पुढाऱ्यांचाही कस लागला आहे.
देवणी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी कमालवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. काही गावांतून ५७ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ११ जागांसाठी एकही उमेदवारांनी अर्ज न आल्याने त्या जागा रिक्त आहेत. उर्वरित ३३ गावांतील २१२ सदस्यांसाठी निवडणुका होत असून, एकूण ५०५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात २७३ महिला, तर २३२ पुरुष उमेदवार आहेत. तालुक्यात पुरुष उमेदवारांपेक्षा महिला उमेदवार अधिक आहेत, त्यामुळे चर्चा होत आहे.
तालुक्यातील मानकी, कमरुद्दीनपूर, बटनपूर येथे केवळ एक - दोन जागांसाठी निवडणूक होत आह. डोंगरेवाडी येथे ७ जागांपैकी सहा जागांवर उमेदवारी अर्ज न आल्याने सदर ग्रामपंचायत ही कायदेशीर तांत्रिक अडचणीमुळे अस्तित्वात येणार नाही.
वलांडी, धनेगावकडे लक्ष...
मांजरा पट्ट्यातील धनेगाव, जवळगा, वलांडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नागराळ, तळेगाव, विळेगाव, विजयनगर, भोपणी या गावांकडे लक्ष लागून आहे. येथील राजकीय मंडळींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
सध्या गावागावांत गट - तट, हेवेदावे, रुसवे - फुगवे वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या परीने प्रचार करीत आहे.
तरुण उतरले गावच्या कारभारात...
कोरोनाच्या संकटामुळे मुंबई, पुणे, हैदराबाद येथे नोकरी, व्यवसायानिमित्ताने असलेले तरुण गावाकडे परतले आहेत. हे तरुण गावातील राजकारणात सक्रिय झाले आहेत. काही ठिकाणी हे तरुण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे गावात राजकीय चित्र बदलल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे जोरदार चुरस होत आहे.
माहेरचा मान - सन्मान...
देवणी तालुका हा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर आहे. तालुक्यातील बहुतांश गावांतील नागरिकांचे सोयरे संबंध कर्नाटक आहेत. येथील मुलींचे सासर कर्नाटकात असले तरी अद्याप या मुलींची नावे आपल्या गावच्या मतदार यादीत आहेत. अशा मतदारांची संख्या कमी असली तरी ग्रामपंचायत निवडणुकीत ती मते निर्णायक ठरणार असल्याने उमेदवार आता या मतदारांनी भगिनींना सन्मानाने बोलावण्याचे नियोजन सुरू केले आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात कर्नाटकात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. तिकडील मुली या भागातील सुना असल्या तरी त्यांची नावे तिथेच असल्याने तेथील बंधूंनी आपल्या भगिनींना सन्मानाने बोलावून घेऊन मतदान करून घेतले होते.
महिनाभरापासून या भागात माहेरचा मान - सन्मान सुरू झाला असून, तो कुतुहलाचा विषय झाला आहे.
गट - तटाचे राजकारण वाढले...
ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांचा संबंध येत नसल्याचे सांगत काही गावात विविध राजकीय पक्षांच्या मंडळींनी एकत्र येऊन पॅनल उभे केले आहे. काही ठिकाणी राजकीय पक्षानुसार निवडणुकीचा फड लढविला जात आहे. परंतु, काहीजण त्यातून भूमिगत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तो एकटाच निवडणूक लढवित असल्याचे पाहावयास मिळत आहे.