लातूरमध्ये अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी; १२५ दुचाकीचालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 07:54 PM2018-10-15T19:54:17+5:302018-10-15T19:54:32+5:30

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

A motorcycle in the hands of minors in Latur; 125 Restrictive Action on Two Wheeler drivers | लातूरमध्ये अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी; १२५ दुचाकीचालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

लातूरमध्ये अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी; १२५ दुचाकीचालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Next

लातूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस एकूण १२५ दुचाकीचालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास निम्म्यापेक्षा अधिक चालक हे १८ वर्षे वयोगटाच्या आतील असल्याचे आढळून आले. 

परिवहन कार्यालयाच्या वतीने लातूर शहरातील वेगवेगळ्या चौकात आणि मार्गांवर गेल्या दोन दिवसांपासून वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, वाहतुकीचे नियम मोडणे, परवाना नसणे, कागदपत्र जवळ नसणे यासह ट्रिपल सीट, भरधाव वाहने चालविणे आणि बेशिस्तपणे शहरातील रस्त्यांवर वावरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील गांधी चौक, गुळ मार्केट चौक, गंजगोलाई, शाहू चौक, विवेकानंद चौक, रिंग रोड परिसर, महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक, शिवाजी चौक, पाच नंबर चौक, रेणापूर नाका आदी ठिकाणी वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.

यामध्ये दोषी आढळलेल्या १२५ दुचाकी चालकांचे वाहन जप्त करण्यात आले आहे. सोमवारी दंड भरल्यानंतर हे वाहन संबंधित चालकांच्या ताब्यात दिले जाणार आहे. ही मोहीम परिवहन अधिकारी अमर पाटील, उपप्रादेशिक अधिकारी संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. यावेळी मोहिमेत सहायक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग, राजू नागरे, संदीप शिंदे, सहायक मोटार वाहन निरीक्षक राहुल माने, किरण बनसोडे यांचा सहभाग होता.

मुलांच्या हाती वाहन देऊ नका
गेल्या दोन दिवसांपासून राबविण्यात येणाऱ्या वाहन तपासणी मोहिमेत १२५ दुचाकींपैकी बहुतांश दुचाकीचे चालक हे अल्पवयीन असल्याचे पुढे आले आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: A motorcycle in the hands of minors in Latur; 125 Restrictive Action on Two Wheeler drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.