एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:14+5:302021-07-07T04:25:14+5:30
यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार परीक्षा कधी होणार आहेत, याबाबत आयोगाकडून कसलेही निर्देश निघालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता ...
यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार
परीक्षा कधी होणार आहेत, याबाबत आयोगाकडून कसलेही निर्देश निघालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे.
२०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, त्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कसलेही परिपत्रक जाहीर झाले नाही.
ऑनलाइन अन् ऑफलाइन क्लास बंद
कोविडमुळे ऑफलाइन क्लास बंद आहेत, तर ऑनलाइन क्लास परवडणारा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी घरीच पूर्वीच्या नोट्सवर अभ्यास करीत आहेत.
पुण्या-मुंबईत ऑनलाइन क्लासेस असतील, परंतु ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडणारे नाहीत. लातूरसारख्या शहरातील क्लासेस बंद आहेत.
पैसा, अँड्राईड मोबाईल, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याने क्लासेस नाहीत.
क्लासेस चालक अडचणीत
भरती प्रक्रिया ठप्प असल्यामुळे लातुरातच काय, पुण्या-मुंबईतही स्पर्धा परीक्षेचे क्लासेस बंद आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी ग्रामीण भागातला आहे. शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील हे विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांना ऑनलाईन क्लासेस ही प्रणाली परवडणारी नाही. शहरात राहून पूर्वीच्या केलेल्या क्लासेसवरच त्यांनी तयारी केली आहे. एमपीएससीसह शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस या पदांची भरती प्रक्रिया बंद असल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. क्लास चालकांचेही नुकसान आहे. अनेकांनी क्लासेस बंद केले आहेत. - प्रा. सुधीर पोतदार
विद्यार्थ्यांचे वय निघून चालले
भरती प्रक्रिया ठप्प आहे. शिवाय, आयोगाच्या परीक्षेचाही ताळमेळ नाही. कोविडमुळे ऑफलाइन क्लासेस बंद आहेत. ऑनलाइन क्लासेस परवडणारे नाहीत. शासनाच्या धोरणामुळे आयुष्य वाया जात आहे. - गौतम साळवे
पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले. परंतु, आजपर्यंत परीक्षा झाली नाही. यातील अनेक विद्यार्थ्यांच्या वयाची अट संपत आहे. ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक या सर्व पदांची भरती ठप्प आहे. - श्रीमंत सूर्यवंशी