"मुख्यमंत्री साहेब, यंदापासून मोफत उच्च शिक्षण सुरू करा"; लातूरच्या ९२ मुलींची पत्रातून मागणी
By आशपाक पठाण | Published: June 22, 2024 06:56 PM2024-06-22T18:56:55+5:302024-06-22T18:58:03+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्या पालकांचे उत्पन्न ८ लाखाच्या आत आहे, अशा मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याचे सुतोवाच केले होते.
लातूर : राज्य सरकारने चालू शैक्षणिक वर्षापासून मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करावे, अशी मागणी करीत लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील ९२ मुलींनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून विनंती केली आहे.
ग्रामीण व शहरी भागातील अनेक कुटूंबातील मुली परिस्थिती अभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. गुणवत्ता असूनही बारावीनंतर मुलींचे शिक्षण बंद होते. या मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण मोफत करणे आवश्यक आहे. मुलींच्या या भावना शासनापर्यंत पोचविण्यासाठी आधार माणुसकीच्या उपक्रमाने पुढाकार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्या पालकांचे उत्पन्न ८ लाखाच्या आत आहे, अशा मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याचे सुतोवाच केले होते. निवडणूक झाल्यानंतर पाटील यांनी हा निर्णय लवकरच घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आदेश अजून निघाले नाहीत.
गरजवंत मुलींना मोठा आधार...
राज्य शासनाने मुलींसाठी चांगला विचार केलेला आहे. याचे कायद्यात रूपांतर होऊन यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा निर्णय लागू व्हावा अशी अपेक्षा मुलींनी व्यक्त केली आहे. विविध गावात अशा मुली आहेत, की ज्यांचे वडील मजुरी करतात, कोणी रिक्षा चालक, कोणी कारागीर, मेकॅनिकल, बांधकाम मिस्त्री आहेत. अशा पालकांच्या मुलींना उच्चशिक्षण घेणे मुश्कील असते. त्यामुळे हे शिक्षण मोफत झाले तर मुलींच्या शिक्षणाची सोय होणार आहे. याप्रसंगी प्रा. डी के. देशमुख, प्रा. जयराज गंगणे, प्रा. गायकवाड,सहशिक्षिका संगीता पवार, प्रशांत बर्दापूरकर यांची उपस्थिती होती.
निर्णय होणे आवश्यक- ॲड. संतोष पवार
आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी मुलींच्या उच्च शिक्षणाचा निर्णय राज्य शासन तत्काळ घ्यावा यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी मुलींना माहिती दिल्यावर लागलीच राजर्षी शाहू महाविद्यालयातील ९२ विद्यार्थींनींनी मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड लिहिले आहे. आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्फे पोस्टाव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले जात आहेत.