टाळ- मृदंग, हलगीच्या निनादात ग्रामस्थांचे खरोळा फाटा- पानगाव रस्त्यासाठी रास्तारोको

By हरी मोकाशे | Published: December 26, 2022 04:55 PM2022-12-26T16:55:27+5:302022-12-26T16:55:52+5:30

पिंपळगाव फाट्यावर आंदोलन; लातूर- अंबाजोगाई महामार्गावर वाहतूक ठप्प

Mridang, Halgi chants in the rastaroko of the villagers for the Kharola phata - Pangaon | टाळ- मृदंग, हलगीच्या निनादात ग्रामस्थांचे खरोळा फाटा- पानगाव रस्त्यासाठी रास्तारोको

टाळ- मृदंग, हलगीच्या निनादात ग्रामस्थांचे खरोळा फाटा- पानगाव रस्त्यासाठी रास्तारोको

googlenewsNext

रेणापूर (लातूर) : तालुक्यातील खरोळा फाटा ते पानगाव हा रखडलेला रस्ता तयार करावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील पिंपळफाटा रेणापूर येथे पानगाव व जवळपास १३ गावांतील नागरिकांनी टाळ- मृदंग व हलगीच्या निनादात दोन तास रास्तारोको आंदोलन केले. या समस्येसंदर्भात येत्या शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

उमरगा- खामगाव महामार्ग क्र. ३६१ हा पानगावातून परळी मार्गे जातो. या मार्गाला २०१८ मध्ये मंजुरी मिळून कामाला सुरुवात झाली होती. उमरगा ते खरोळा फाटा आणि परळी ते पानगाव रेल्वेगेटपर्यंत रस्ता तयार झाला. पानगाव रेल्वेगेट ते खरोळा फाट्यापर्यंतचा १४ किमीचा रस्ता मावेजामुळे होऊ शकला नाही. तालुक्यातील पानगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी स्मारक आहे. तसेच १२ व्या शतकातील विठ्ठल-रुक्मिणीचे हेमाडपंथी मंदिर आहे. हैदराबाद- परळी रेल्वे मार्ग येथूनच आहे. याशिवया, साखर, गुळ कारखान्यासह कापूस जिनिंग, ऑईल मिल्स आहेत. मात्र, रस्त्याअभावी मोठी अडचण होत आहे. आंदोलनात ईश्वर गुडे, संतोष नागरगोजे, चंद्रचुड चव्हाण, सुकेश भंडारे, प्रदीप कुलकर्णी, गोविंद दुड्डे, गिरीधर मोटाडे, ज्ञानोबा गुरव, गणेश वांगे, बाळू भंडारे, बाळू चव्हाण, विकास तोष्णीवाल, संतोष मद्दे, दत्तात्रय भंडारे, माधव बरुळे आदी सहभागी झाले होते.

१४ गावांतील ग्रामस्थ आक्रमक...
हा रस्ता तयार व्हावा म्हणून रास्तारोको, गाव बंद करण्यात आले. परंतु, रस्ता झाला नाही. त्यामुळे पानगावसह परिसरातील फावडेवाडी, मुसळेवाडी, भंडारवाडी, पाथरवाडी, गोविंदनगर, रामवाडी (पानगाव), मुरढव, माकेगाव, गोढाळा, घनसरगाव, चुकारवाडी, कोष्टगाव, दिवेगाव येथील ग्रामस्थांनी सोमवारपासून पानगाव बंद ठेऊन रेणापूर पिंपळफाट्यावर रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता.

बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलन...
गावकरी व महामार्गाचे अभियंता गौरीशंकर स्वामी यांची शनिवारी बैठक झाली. परंतु, तोडगा न निघाल्याने सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या मार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे...
आंदोलनकर्त्यांनी मागणी केलेला रस्ता २०१८ मंजूर झाला होता. प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली होती. दरम्यान काही शेतकऱ्यांनी जमिनीचा मावेजा मिळावा म्हणून काम अडविले होते. तेव्हापासून हे काम रखडले. या रस्त्यासाठी पानगाव ग्रामस्थांनी निवेदने देऊन आंदोलने केली. त्यामुळे केंद्रीय रस्ते महामार्गच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तीन प्रस्ताव पाठविले. त्यात त्रुटी निघाल्या. त्यामुळे पुन्हा २४ डिसेंबर २०२२ रोजी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

 

Web Title: Mridang, Halgi chants in the rastaroko of the villagers for the Kharola phata - Pangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.