वीज ग्राहकांना महावितरणचा शाॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:54+5:302021-01-25T04:19:54+5:30
लातूर : रीडिंगअभावी सरासरी बिले ग्राहकांच्या हाती ठेवण्यात आल्याने लातूर परिमंडळातील लातूर, उदगीर, निलंगा विभागातील शेकडो ग्राहक त्रस्त झाले ...
लातूर : रीडिंगअभावी सरासरी बिले ग्राहकांच्या हाती ठेवण्यात आल्याने लातूर परिमंडळातील लातूर, उदगीर, निलंगा विभागातील शेकडो ग्राहक त्रस्त झाले आहेत. जादा बिल आल्याने ग्राहक तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात खेटे मारत आहेत. मात्र समाधान काही होत नसल्याचे चित्र आहे.
महावितरणच्या लातूर परिमंडळात एकूण ५ लाख १२ हजार ८८२ वीज ग्राहकांची संख्या आहे. यातील तब्बल ३ लाख ४० हजार ५३९ घरगुती ग्राहक आहेत. गेल्या सहा महिन्यापासून या ग्राहकांच्या मीटरची रीडिंगच कुणी घेत नसल्याचे त्रस्त झालेल्या ग्राहकातून सांगितले जात आहे. अचानकपणे आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलामुळे हे ग्राहक त्रस्त झाले आहेत. आपल्याला आलेले वीज बिल चुकीच्या पद्धतीने आले आहे. आपल्या मीटरची तपासणी करण्यात यावी. रीडिंगची पाहणी करण्यात यावी, प्रत्यक्ष वापर झालेल्या रीडिंगची नोंदणी करावी, अशा आशयाच्या तक्रारी वीज ग्राहकांनी संबंधित कार्यालयाकडे केल्या आहेत. लाॅकडाऊनच्या काळात अनेक दुकानदारांची दुकाने बंद होती. त्यामुळे वीज वापरण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली आहे. मात्र वीज बिल भरण्यासंदर्भात तगादा लावला जात आहे. अनेक तक्रारींचा अद्यापही निपटारा झाला नाही. अनेक तक्रारी अद्यापही त्या त्या कार्यालयात पडून आहेत.
रीडिंग न घेता सरासरी बिलांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यातून वीजग्राहक त्रस्त आहेत. याबाबत तक्रार केली तरी समाधानकारक उत्तर मिळत नाही. केवळ टप्प्याटप्प्याने वीज बिल भरण्याचा सल्ला दिला जातो. यातून वीजग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
- बालाजी पाटील, वीज ग्राहक
घरगुती आणि शेतीसाठी लागणाऱ्या कृषी पंपाची वीज बिलेही सरासरी दिल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही तोडगा निघत नाही. शेवटी बिल भरण्याचा सल्ला दिला जात आहे. यातून महावितरणने मार्ग काढावा.
- अंगद किनीकर, वीज ग्राहक