‘मुळशी पॅटर्न’ पाहून खून, क्षुल्लक कारणावरून घडले अनेक गुन्हे; पोलिसांचा कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:31 PM2022-04-08T12:31:43+5:302022-04-08T12:33:33+5:30
अलीकडे अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांनी डोके वर काढले आहे.
- राजकुमार जोंधळे
लातूर : सुसंस्कृत आणि शांत शहर म्हणून लातूरची ओळख असली तरी गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांमुळे याला काहीअंशी गालबोट लागले होते. दोन खून, चार दरोडे आणि दहशतीच्या चार घटना घडल्याने सार्वजनिक शांतता भंग झाली होती. विशेष म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट पाहून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडल्याने शहर हादरले.
अलीकडे अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांनी डोके वर काढले आहे. केवळ क्रेझ आणि दाक्षिणात्य चित्रपटातील गुन्हेगारीचे असलेले आकर्षण. याच आकर्षणातून गुन्हेगारीमध्ये कोयता, चाकू, तलवारीचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. गोकुळ मंत्री याचा भरदिवसा कोयता, धारदार शस्त्र आणि चाकूने वार करून खून करण्यात आला होता, तर लातुरातील गजबजलेल्या साईमंदिर परिसरात एका वर्गमित्राचा खून एका १७ वर्षीय मित्रानेच ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट पाहून केला होता. हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार, कोयता घेऊन डान्स करणाऱ्या नवरदेवाचा, मित्राचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नवरदेवासह इतरांना अटक केली आहे.
टोळ्यांची दहशत मोडून काढू...
लातुरात टोळीटोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्या अलीकडे डोके वर काढत होत्या. मात्र, पोलिसांनी अशा गटांना, टोळ्यांना आणि गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. पंकज पारीख टोळीतील सराईत सहा गुन्हेगारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोरातील कठोर कारवाई पोलीस करतील.
- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर.
गत सहा महिन्यांतील गुन्हे
दिवसाढवळ्या खून - २ (लातूर )
दरोडा - ४ (लातूर, चाकूर)
सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे - ४ (लातूर)
मोक्का कारवाई - ६ जणांवर (लातूर)