लातूर शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन
By हणमंत गायकवाड | Published: April 6, 2024 01:01 PM2024-04-06T13:01:05+5:302024-04-06T13:01:12+5:30
लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन सुरू
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात १२ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता आठ दिवसात ऐवजी पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. लातूर शहराला महिन्याला एक दलघमी पाण्याची गरज आहे. तर मांजरा प्रकल्प वरील सर्व योजना मिळून महिन्याला दोन दलघमी पाणी लागते. या सर्व बाबींचा विचार केला तर, सध्याचा उन्हाळा आणि पावसाळा संपेपर्यंत मांजरा प्रकल्पातील पाणी पुरवू शकते. त्यामुळेही पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
मांजरा प्रकल्पात एकूण पाणीसाठा ५९ दलघमी आहे. यातील १२ दलघमी जिवंत तर ४७ दलघमी मृत पाणीसाठा आहे. मांजरा प्रकल्पात वरील सर्व पाणीपुरवठा योजनांना त्यांच्या मागणीनुसार पाणी उचल झाले तरी उन्हाळा आणि पावसाळा संपेपर्यंत प्राप्त पाणीसाठा पुरवू शकतो. लातूर शहरासाठी दररोज ५५ ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्या काही दिवसांपासून काटकसर या नावाखाली शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणी उचलणे बंद होते. यामुळे शहरवासीयांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यासंदर्भात नियोजन सुरू केले आहे. शहरातील जलकुंभनिहाय वितरणाचे वेळापत्रक तयार केले जात आहे.
शहरातील अनेक विद्युत पंप आटले
लातूर शहरात विद्युत पंप आणि हातपंप आहेत. त्यापैकी अनेक पंपांचे पाणी गेलेले आहे. त्यामुळे आठ दिवसातला सोडण्यात येणारे पाणी शहरवासीयांना पुरत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळेही आता पाच दिवसात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. पंपाची पाणी पातळी घटली आहे. या पंपाच्या जीवावर महापालिकेने आठ दिवसाआड पाणीपुरवठा गेल्या महिनाभरापासून सुरू केला होता. मात्र अनेक भागातून पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने आता पाच दिवसात पाणीपुरवठा केला जाईल.
शांतता समितीच्या बैठकीत आयुक्तांनी दिले संकेत
शहरातील विद्युत पंपाचे पाणी पातळी घटलेली आहे. अनेक बोरचे पाणी गेलेले आहे त्यामुळे शांतता समितीच्या बैठकीमध्ये आयुक्तांनी पाच दिवसात पाणीपुरवठा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे.
मांजरा प्रकल्पातील स्थिती
प्रकल्पात सध्या: ५९:२५८ दलघमी
प्रकल्पात मृत पाणीसाठा : ४७:१३० दलघमी
जिवंत पाणीसाठा :१२:१२८ दलघमी
जिवंतपाणीसाठ्याची टक्केवारी : ६.८५ टक्के