उदगीरात अतिक्रमणावर नगरपालिकेचा हातोडा

By संदीप शिंदे | Published: June 21, 2023 05:36 PM2023-06-21T17:36:02+5:302023-06-21T17:36:12+5:30

सरसकट अतिक्रमण हटवावे, शहरातील नागरिकांची मागणी

Municipal hammer on encroachment in Udgir | उदगीरात अतिक्रमणावर नगरपालिकेचा हातोडा

उदगीरात अतिक्रमणावर नगरपालिकेचा हातोडा

googlenewsNext

उदगीर : नगरपालिकेच्या वतीने बुधवारी शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आली. शहरातून गेलेल्या या मध्यवर्ती रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे जीवघेणे ठरत होते.. यासंदर्भात माजी मंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली.

मागील अनेक दिवसांपासून शहरातील अतिक्रमणाचा विषय नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा बनला होता. शहराचा वाढता विस्तार पाहता रस्ते अतिक्रमणमुक्त होणे अपेक्षित होते. परंतु दिवसेंदिवस मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढतच चालले होते. त्याअनुषंगाने १४ जुन रोजी माजी मंत्री आ. संजय बनसोडे व पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये शहरातून गेलेल्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे त्वरित काढण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

बुधवारी सकाळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमावर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज चौकापासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पानटपऱ्या, भाजी व फळविक्रेते, चहाचे ठेले यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. ही मोहीम दुपारपर्यंत सुरु होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण काढताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, काही दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगरपालिकेचे विरेंद्र गुळागडे, प्रमोद काष्टेवाड, सहाय्यक नगर रचनाकार मोरे, सिकंदर शेख, विनोद रगवाळ, अमित सुतार, उमाकांत गंडारे, विद्युत विभागाचे उदय ईपल्ली, अतिक्रमण विभागाचे मनोज बलांडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता शहर पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली.

अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरुच राहणार...
उदगीर नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी सकाळपासून छत्रपती शाहू महाराज चौकापासून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. दुपारपर्यंत सुरु असलेल्या या मोहीमेत अतिक्रमण काढण्यात आले आहे. तसेच ही मोहीम सुरुच राहणार असल्याचे उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी सांगितले.

Web Title: Municipal hammer on encroachment in Udgir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.